संभाजीराजेंचे आज जल्लोषी स्वागत, हत्ती, घोडे, मावळ्यांचा लवाजमा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:39 PM2022-03-10T12:39:57+5:302022-03-10T12:40:34+5:30
सायंकाळी पाच वाजता शिवाजी चौकातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. हत्ती व घोड्यावर पारंपरिक वेशभूषेतील मावळे, पारंपरिक वाद्य, मर्दानी खेळ, वारकरी पथक, लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. हत्तीवरून साखर वाटप करण्यात येणार
कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी तीन दिवस मुंबईत उपोषण केले. त्यामुळे मागण्या मार्गी लागल्या. उपोषणानंतर ते पहिल्यांदाच गुरुवारी (दि.१०) कोल्हापुरात येत आहे. यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले जाणार असून, पारंपरिक वाद्यासह शिवाजी चौकातून मिरवणूक काढली जाणार आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असला तरी समाजाच्या इतर मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी खासदार संभाजीराजे मुंबईत आझाद चौकात उपोषणाला बसले होते. तीन दिवस उपोषण सुरू राहिल्याने राज्य सरकारवर दबाव आला आणि चर्चेतून प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या.
‘सारथी’ संस्थेला सक्षम करत असताना निधीची तरतूद केली. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. सकल मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मार्गी लागल्याने समाजात आनंदाचा वातावरण आहे. उपोषणानंतर संभाजीराजे पहिल्यांदाच कोल्हापुरात येत असून त्यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला होता. त्यानुसार जय्यत तयारी केली आहे.
खासदार संभाजीराजे गुरुवारी दुपारी ४ वाजता कोल्हापुरात येणार असून रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर ताराराणी पुतळा, छत्रपती राजाराम महाराज, दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळा, नर्सरी बागेतील शाहू महाराज समाधी स्थळाला भेट देणार आहेत.
सायंकाळी पाच वाजता शिवाजी चौकातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. हत्ती व घोड्यावर पारंपरिक वेशभूषेतील मावळे, पारंपरिक वाद्य, मर्दानी खेळ, वारकरी पथक, लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. हत्तीवरून साखर वाटप करण्यात येणार असून, कोल्हापूरकरांनी मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.