Kolhapur: विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी संभाजीराजे गडावर जाणार, गडावर कडेकोट पोलिस बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 05:25 PM2024-07-13T17:25:30+5:302024-07-13T17:26:18+5:30
गडावर जाण्यास बंदी
राजू लाड
आंबा : विशाळगडगडावरील अनाधिकृत अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी उद्या, रविवारी हिंदूत्ववादी संघटना व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती थेट विशाळगडावरील अतिक्रमण विरोधात आंदोलन छेडीत आहेत. या पार्श्वभूमीवर विशाळगडला कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे गडावर पोलिस छावणीचे रूप आले होते.
आज पहाटे पन्नास भर पोलिसाची कुमक गजापूर व गडाच्या पायथ्याशी दाखल झाली. सकाळी गडावरील भगवा चौक, मुंडा दरवाजा व पायथ्याला पोलीस बंदोबस्त कडेकोट करण्यात आला. गडावर जाणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आल्याने पायथ्यापासून वाहने परतत होती. विशाळगडसह गजापूर व केंबुर्णेवाडी या परीसरात शुकशुकाट पसरला होता.
गडावर जाण्यास बंदी
दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर व शाहूवाडी पोलीस विभागाच्या सात वाहनातून दीडशेंच्यावर पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी विशाळगड पायथ्याला दाखल झाली. पांढरेपाणी येथे पोलीस गर्दीवर लक्ष ठेवून होते. पावणखिंडीत जाणारी अनेक वाहने रोखली होती. बाहेरील व्यक्तीस गडावर जाण्यास बंदी घातली. स्थानिकांची नाव नोंदणी करून, खात्री करूनच गडावर सोडले जात होते. गड व पायथ्याच्या व्यवसायिकांनी सकाळपासून सर्व व्यवहार बंद ठेवणे पसंत केले. सकाळपासून पावसाने जोर धरला होता. मलकापूर व मार्ग परीसरात संभाजीराजे यांनी आवाहन करणारे फलक लावले होते.