संभाजीनगर कामगार चाळ धोकादायक
By admin | Published: August 6, 2015 11:47 PM2015-08-06T23:47:59+5:302015-08-06T23:47:59+5:30
महापालिकेची नोटीस : १०० कुटुंबांचा जीव टांगणीला, रहिवाशांची कॉम्प्लेक्समध्ये पुनर्वसनाची हमी
गणेश शिंदे कोल्हापूर --४० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या संभाजीनगर कामगार चाळीमधील कुटुंबांना महापालिका प्रशासनाने नोटिसा पाठविल्यामुळे या चाळीत राहणाऱ्या सुमारे १०० कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे.
कोल्हापूर महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी नगरपालिकेने १९७४ मध्ये संभाजीनगर येथील रेसकोर्स नाक्यासमोर ‘संभाजीनगर कामगार चाळ’ या नावाने महापालिकेचे सफाई कामगार व झाडू कामगार यांच्यासाठी तत्कालीन आयुक्त डी. एन. कपूर व देवस्थळी यांच्या कारकिर्दीत ही चाळ बांधण्यात आली. दरम्यान, या चाळीत १९४८ मध्ये चार बैठी (कौलारू ) घरे होती. ती घरे सुमारे ३०० स्क्वेअर फुटांची, तर त्यानंतर बांधण्यात आलेली आरसीसीची घरे सध्या सुमारे २७० स्क्वेअर फुटांची आहेत. साधारणत: दीड ते दोन एकरांत ही चाळ वसली आहे.
चाळीमध्ये पाच इमारती असून तिथे सुमारे शंभर कुटुंबांचे वास्तव्य आहे. महापालिका प्रशासन महापालिकेच्या या कामगारांकडून पगारामधून घरभाडे भत्ता कपात करते. दरम्यान, ४ आॅगस्ट २०१५ रोजी महापालिका प्रशासनाने कामगार चाळीतील कुटुंबांना ही चाळ धोकादायक बनली असल्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. यामुळे नागरिक चिंतेत आहेत.
महापालिका इमारत पाडून उभारणार कॉम्प्लेक्स...
संभाजीनगर कामगार चाळ पाडून या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. या कॉम्प्लेक्समध्ये खाली दुकानगाळे, तर वरच्या मजल्यावर या कामगारांना घरे बांधून देणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
रहिवाशांचेही कॉम्प्लेक्समध्ये पुनर्वसन करण्याची हमी
ही चाळ धोकादायक बनली आहे. आपण ती १५ दिवसांत खाली करणे आवश्यक आहे. या ठिकाणी नवीन इमारत बांधून २००५ मध्ये झालेल्या महासभेच्या ठरावानुसार नवीन इमारतीत तुमचे पुनर्वसन करण्यात येईल, अशा नोटिसा महापालिका प्रशासनाने या कुटुंबांना पाठविल्या आहेत.
चाळीमधील सर्वांची लवकरच याप्रश्नी बैठक घेणार आहे व त्यात चर्चा केली जाईल. अजून ही इमारत २५ ते ३० वर्षे टिकेल, असे प्रथमदर्शनी दिसून येते. याप्रश्नी प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी आहे. - अनिल मोहन पटवणे, रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते