संभाजीपूरचा प्रस्ताव प्रलंबित : उपनगरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:26 AM2017-12-26T00:26:15+5:302017-12-26T00:27:14+5:30
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील त्रेपन्नावे गाव म्हणून ओळखले जाणाºया संभाजीपुरातील सर्वच उपनगरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जोडावीत, या मागणीचा प्रस्ताव
संदीप बावचे।
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील त्रेपन्नावे गाव म्हणून ओळखले जाणाºया संभाजीपुरातील सर्वच उपनगरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जोडावीत, या मागणीचा प्रस्ताव चार वर्षांपासून प्रलंबित राहिला आहे. गाव एक आणि पोलीस ठाणी दोन अशा परिस्थितीमुळे बहुतांशी उपनगरातील नागरिकांना पाच किलोमीटर अंतरावर असणाºया शिरोळ पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सन २०१३ साली शिरोळ तालुक्यातील त्रेपन्नावे गाव म्हणून संभाजीपूरची स्थापना झाली. ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर उपनगरांना भेडसावणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी तत्कालीन सरपंच सविता पाटील-कोथळीकर यांनी पुढाकार घेऊन संभाजीपूरमधील शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारी उपनगरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी जोडावीत, अशा मागणीचा प्रस्ताव दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण भागात असलेली पद्मावती कॉलनी, बालाजी पार्क, शिखरे कॉलनी, माता सावित्रीबाई फुले गृहनिर्माण संस्था यासह सुमारे चौदा उपनगरे शिरोळ पोलीस ठाण्याशी निगडित आहेत.
एखाद्या अपघाताची घटना घडल्यास शिरोळ पोलीस ठाण्यालाच नागरिकांना संपर्क करावा लागतो. मात्र, अवघ्या काही अंतरावरच जयसिंगपूर पोलीस ठाणे असतानाही केवळ हद्दीमुळे नागरिकांना नाइलाज होतो. शिरोळ-कोल्हापूर बायपास मार्गावर अपघाताची माहिती समजताच जयसिंगपूर पोलीस तत्काळ हजर होतात. मात्र, अंतरामुळे शिरोळ पोलीस ठाण्याला वेळ लागतो.
अशा नाहक त्रासामुळे संभाजीपूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली उपनगरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जोडावीत, असा प्रस्ताव पोलीस खात्याकडे दाखल केला. सन २०१४मध्ये हा प्रस्ताव जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयामार्फत जिल्हा पोलीसप्रमुखांना पाठविण्यात आला आहे. तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीदेखील या प्रस्तावाला शिफारस दिली होती. मात्र, हा प्रस्ताव गृहखात्याच्या लालफितीत अडकला आहे. अनेकवेळा पाठपुरावा करूनदेखील हा प्रस्ताव प्रलंबित पडला आहे. गाव एक आणि पोलीस ठाणे दोन यामुळे नागरिकांची
होणारी गैरसोय केव्हा थांबणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वास्तविक, कायदा व सुव्यवस्थेचाप्रश्न निर्माण झाल्यास तत्काळ पोलीस यंत्रणा पोहोचण्यासाठी शेजारील पोलीस ठाणेच उपयुक्तठरते. असे असतानाही वरिष्ठपोलीस प्रशासन यंत्रणा कागदी घोडे नाचवीत आहे, असेच चित्र दिसून येत आहे.
नांगरे-पाटील यांना साकडे
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी नागरिकांशी सुसंवाद या कार्यक्रमांतर्गत प्रश्न जाणून घेतले होते. यावेळी संभाजीपूरच्या या प्रश्नाबाबत नांगरे-पाटील यांना साकडे घालण्यात आले होते. त्यांनीही याप्रश्नी लक्ष घालू असे आश्वासन दिले होते. त्यांनाही या प्रश्नाचा विसर पडला असल्याचेच चित्र सध्यातरी दिसत आहे.
संभाजीपूरमध्ये उपनगरांचा जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समावेश करावा, या मागणीसाठी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ग्रामपंचायत पदाधिकाºयांचे शिष्टमंडळ घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांची भेट घेणार आहोत.
- दिलीप पाटील-कोथळीकर,
ग्रामपंचायत सदस्य, संभाजीपूर