बखरकारांकडून संभाजीराजेंची बदनामी
By Admin | Published: December 6, 2015 01:30 AM2015-12-06T01:30:21+5:302015-12-06T01:32:38+5:30
रमेश जाधव : ‘अद्वितीय छत्रपती श्री संभाजी महाराज’ ग्रंथाचे प्रकाशन
कोल्हापूर : बखरकारांनीच छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. बखरकार मल्हार रामचंद्र चिटणीस यांनी पूर्वग्रहदूषितपणा ठेवून संभाजी महाराजांचा बदनामीजनक इतिहास रंगवून तो मांडला, असे प्रतिपादन विचारवंत प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी शनिवारी येथे केले.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे अॅड. अनंत दारवटकर (पुणे) लिखित ‘अद्वितीय छत्रपती श्री संभाजी महाराज : खंड १ ते ५’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ग्रंथाचे प्रकाशन प्रा. डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत इतिहासतज्ज्ञ प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई, प्रबोधन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. बी. शिंदे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची होती.
यावेळी प्रा. डॉ. रमेश जाधव म्हणाले, संभाजी महाराजांचे रंगविण्यात आलेले चित्र हे बखरीवर आधारितच आहे. त्यामधून मल्हारराव चिटणीस यांच्यासारख्या बखरकारांनी वाईट हेतूने चुकीचा इतिहास मांडला. असे असले तरी काही इतिहासकारांनी संभाजीराजेंचे चांगले चित्रही समोर आणले हे नाकारून चालणार नाही.
अनंत दारवटकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो. हे लक्षात आल्यावर खऱ्या इतिहासाची चिकित्सा जागृत झाली. त्यानंतर आपण याकडे वळलो. भारत संशोधन मंडळात जायला लागल्यानंतर यातील अनेक गोष्टी समोर आल्या. खरा इतिहास मांडण्याच्या हेतूनेच आपण संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा ग्रंथ लिहू शकलो. संशोधनातून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे.
जे. बी. शिंदे म्हणाले, इतिहासाचा विपर्यास केला जात असल्याची सद्य:स्थिती आहे. अशा वातावरणात संभाजी महाराजांवरील ग्रंथ प्रकाशित होत असल्याने नवे ऐतिहासिक पर्व सुुरू होण्यास हातभार लागणार आहे. संभाजी महाराजांचे चित्र त्रोटक होते; परंतु या ग्रंथाच्या माध्यमातून समग्र इतिहास समोर आला आहे. यामध्ये अनेक कागदपत्रांची छाननी व अभ्यासपूर्ण लेखन करण्यात आल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)