चित्रनगरीसाठी केंद्र सरकारकडून निधी आणू : संभाजीराजे
By admin | Published: May 5, 2017 10:33 PM2017-05-05T22:33:32+5:302017-05-05T22:57:26+5:30
रंगारंग सोहळ््यात चित्रकर्मी पुरस्कारांचे वितरण
-कोल्हापूर : कोल्हापुरात मराठी चित्रपट घडावा, तो जगभर पोहोचावा म्हणून छत्रपती घराण्याने कलाकारांना राजाश्रय दिला त्या घराण्याचे वारसदार म्हणून कोल्हापुरातील चित्रनगरीसह या क्षेत्रातील प्रश्नांची सोडवणूक करणे हे माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून चित्रनगरीचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी दिली. केशवराव भोसले नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने आयोजित रंगारंग सोहळ््यात आणि कोल्हापूरला लाभलेल्या शंभर वर्षांच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास रंगमंचावर सादर करत चित्रकर्मी पुरस्काराचे वितरण झाले. व्यासपीठावर खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, सुजित मिणचेकर, महापौर हसिना फरास, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेता सयाजी शिंदे, हार्दिक जोशी, कर्नाटक येथील गीतकार एम. एन. व्यास राव, दिग्दर्शक निखिल मंजू, व्ही. बी. पाटील, धनाजी यमकर उपस्थित होते. यावेळी ‘चित्रशारदा’ या विशेषांकाचे प्रकाशन झाले. संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरचा चित्रपट जगभर पोहोचावा यासाठी राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज, आक्कासाहेब महाराज, शहाजी महाराजांनी चित्रपटसृष्टीला राजाश्रय दिला. छत्रपती घराण्याचा कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळापासूनच एक जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्यामुळे चित्रपट महामंडळाच्या प्रलंबित कामांतील अडथळे दूर करणे ही माझी जबाबदारी आहे. आमदार सतेज पाटील यांनी चित्रपटसृष्टीच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे. यावेळी डॉ. सुजित मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. एम. एन. व्यास व निखील मंजू यांनी कर्नाटक चित्रपटसृष्टीचे मराठी चित्रपटसृष्टीला सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. प्रास्ताविकात अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी वृद्ध कलाकारांचे मानधन, पुण्याच्या ‘एफटीआय’ला ‘प्रभात’चे नाव देण्यात यावे तसेच सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अॅनिमल वेल्फेअरचे कार्यालय मुंबईत सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, गीतलेखक श्रीकांत नरूले, पटकथा लेखक प्रताप गंगावणे, ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक विलास रकटे, जगदिश पाटणकर, सांगली (निर्माता, दिग्दर्शक, लेखक), अभिनेत्री गीताबाई वंटमुरीकर, प्रकाश शिंदे (छायाचित्रण), अशोक पेंटर (कलादिग्दर्शक), अशोक ऊर्फ प्रकाश निकम (ध्वनिरेखक), सिद्धू गावडे (निर्मिती व्यवस्थापक ), रंगभूषाकार शशी यादव, वेशभूषाकार कमल पाटील, किसन पोवार (लाईटमन- सहा. छायाचित्रण), कृष्णात चव्हाण (लाईटमन विभाग), विजय कल्याणकर (कामगार) यांच्यासह स्वर्गीय बजरंग रामचंद्र भोसले (वाईकर) यांना मरणोत्तर चित्रकर्मी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तब्बल साडेतीन ते चार तास रंगलेल्या या कार्यक्रमात सार्थक क्रिएशन आणि भालकर कला अकादमीच्या कलाकारांनी केलेली बहारदार नृत्ये, भरत दैनी आणि नितीन कुलकर्णी यांच्या खुमासदार निवेदनाने रसिकांना मनोरंजनाची पर्वणी दिली. आनंद काळे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी अभिनेत्री वर्षा उसगांवकर, सतीश रणदिवे, सतीश बिडकर, मिलिंद अष्टेकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ------------ डी. वाय. पाटील ट्रस्टकडून ५० हजारांचा निधी यावेळी आमदार सतेज पाटील यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ््यासाठी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टच्यावतीने ५० हजारांचा निधी जाहीर केला. ---------------- संभाजीराजेंना ब्रँड अॅम्बेसेडर करा यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, खासदार संभाजीराजे यांचे केंद्रात मोठे वजन आहे. चित्रपट महामंडळाने त्यांच्याद्वारे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी त्यांना महामंडळाचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर करा ते दिसतातही रूबाबदार. त्याचा महामंडळाला फायदा होईल. ---------- १५ जूनपासून चित्रनगरीत चित्रीकरण यावेळी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी कोल्हापूर चित्रनगरीत १५ जूनपासून चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जूनला परिसरात दोन हजार झाडे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.