आशिया, युरोपीयन युनियन बैठकीसाठी संभाजीराजे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:47 PM2018-09-26T16:47:03+5:302018-09-26T16:51:08+5:30
दहाव्या आशिया-युरोपीयन संसदीय बैठकीसाठी भारतातर्फे पाठवण्यात येणाऱ्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळामध्ये खासदार संभाजीराजे यांची निवड करण्यात आली आहे. बेल्जियमची राजधानी बु्रसेल्स येथे उद्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कोल्हापूर : दहाव्या आशिया-युरोपीयन संसदीय बैठकीसाठी भारतातर्फे पाठवण्यात येणाऱ्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळामध्ये खासदार संभाजीराजे यांची निवड करण्यात आली आहे. बेल्जियमची राजधानी बु्रसेल्स येथे उद्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये युरोपीयन युनियनचे २८ देश सहभागी होत असून, अशियामधील ४८ देश सहभागी होणार आहेत. यासाठी भारतातील तीन खासदारांचे शिष्टमंडळ जात आहेत. हवामान बदल आणि पर्यावरण : अर्थव्यवस्थेवर पडणारा प्रभाव, हवामान बदल आणि पर्यावरण : स्थलांतरावर पडणारा प्रभाव, हवामान बदल आणि पर्यावरण : सुरक्षेवर पडणारा प्रभाव या महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
प्रत्येक सदस्य देशाच्या संसद सदस्यांना आपल्या देशातील किंवा प्रदेशातील परिस्थिती स्पष्ट करून चर्चेत भाग घेता येणार आहे. हवामान बदलामुळे जगभरात आलेली नैसर्गिक संकटे, आरोग्याच्या समस्या, निरक्षरता, गरिबी अशा अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. खासदार संभाजीराजे यावेळी या विषयांवरील आपली मते मांडणार आहेत.