संभाजीराजेंचे चरित्र आता रंगमंचावर
By admin | Published: May 15, 2015 09:46 PM2015-05-15T21:46:50+5:302015-05-15T23:37:44+5:30
कोल्हापूरच्या इतिहासप्रेमींचा उपक्रम : ‘राजा संभाजी’ नाटकासाठी रविवारी आॅडिशन
कोल्हापूर : राजा शंभू छत्रपती म्हणजे मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासातील एक धगधगते पर्व. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकवताना त्यांनी मृत्यूचाही बेदरकारपणे सामना केला. या वीर योद्ध्याचे प्रेरणादायी जीवनचरित्र आता रंगभूमीवर येत आहे. कोल्हापुरातील इतिहासप्रेमींच्यावतीने ‘नरशार्दुल राजा संभाजी’ या ऐतिहासिक नाटकाची निर्मिती करण्यात येत आहे. येत्या तीन महिन्यांत हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘शिवगर्जना’ तसेच ‘गाथा छत्रपतींची’ या महानाट्यांनंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या लेखणीतून संभाजीराजेंचे चरित्र नाट्यरूपात येत आहे. या नाटकाच्या स्क्रीप्टचे संपादन ज्ञानेश महाराव यांनी केले असून दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण करणार आहेत.
कोल्हापूरच्या दर्जेदार नाटकांच्या परंपरेचेच पाईक म्हणून ‘राजा संभाजी’ हे नाटक निर्माण केले जाणार आहे. यासाठी ५० हून अधिक कलाकारांची आवश्यकता आहे. रविवारी (दि.१७) सकाळी साडेनऊ वाजल्यापासून शाहू स्मारक भवनात आॅडिशन्स होणार आहेत. इच्छुकांनी बायोडाटा व प्रात्यक्षिकांच्या तयारीसह उपस्थित राहावे. (प्रतिनिधी)
आधीच्या नाटकात मृत्यू केंद्रस्थानी
छत्रपती संभाजीराजेंचे चरित्र सांगणारी अनेक नाटके यापूर्वी रंगभूमीवर आली आहेत. त्यांची संख्या शिवाजी महाराजांवरील नाटकांपेक्षाही अधिक आहे. राम गणेश गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ हे पहिले नाटक संभाजीराजेंवर लिहिले. त्यानंतर ‘बेबंदशाही’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘शंभूराजे’ अशी अनेक नाटके गाजली. मात्र, यातील काही नाटकांत संभाजीराजेंच्या केवळ मृत्यूवरच प्रकाशझोत टाकण्यात आला आहे किंवा मग संभाजी महाराजांबद्दल गैरसमज पसरावेत, असे वर्णन आहेत.
‘राजा संभाजीं’चे वैशिष्ट्य
संभाजी महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र मांडणारे हे पहिले नाटक असणार आहे. त्यात संभाजीराजेंच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. संभाजीराजे उत्तम साहित्यिक होते, रसिक होते, मुत्सद्दी लढवय्या होते, त्यांचे राजकारण देशभरात फिरत होते. कुशल राजा म्हणून त्यांनी केलेले कार्य अडीच तासांच्या नाटकात मांडले जाईल.
संभाजीराजेंवर आजवर निर्माण झालेल्या बहुतांशी नाटकांत त्यांचे चारित्र्यहनन किंवा मृत्यूचेच अधिक वर्णन आहे. ‘राजा संभाजी’मध्ये मात्र त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतरच्याही काही घटनांचा समावेश असणार आहे.
- इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक