संभाजीराजेंच्या ‘अभिनंदना’साठी गडहिंग्लजमध्ये ‘चढाओढ’ !

By admin | Published: June 16, 2016 12:42 AM2016-06-16T00:42:12+5:302016-06-16T00:59:15+5:30

राष्ट्रवादीने लावले डिजीटल : जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी गाठला राजवाडा

SambhajiRaje's 'Congratulations!' | संभाजीराजेंच्या ‘अभिनंदना’साठी गडहिंग्लजमध्ये ‘चढाओढ’ !

संभाजीराजेंच्या ‘अभिनंदना’साठी गडहिंग्लजमध्ये ‘चढाओढ’ !

Next

राम मगदूम -- गडहिंग्लज --नूतन खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या अभिनंदनासाठी गडहिंंग्लजमध्येही कार्यकर्त्यांची चढाओढ झाली. जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे व बांधकाम सभापती नितीन देसाई यांनी राजवाड्यावर समक्ष भेटून तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर व नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते रामदास कुराडे, नगरसेवक किरण कदम व सहकाऱ्यांनी येथील दसरा चौकात अभिनंदनाचा डिजीटल फलक लावून छत्रपतींचे अभिनंदन केले आहे.
गतवेळच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य आघाडीकडून पालिकेची सत्ता काढून घेण्यासाठी बाबासाहेब कुपेकर व हसन मुश्रीफ यांनी जोरदार फिल्डींग लावली होती. त्यावेळी संभाजीराजेंनीही गडहिंग्लजमध्ये आठवडाभर मुक्काम ठोकून राष्ट्रवादीच्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केली होती. मात्र, तीन वर्षांनंतर जनता दलाने राष्ट्रवादीकडून पुन्हा सत्ता काढून घेतली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संभाजीराजेंचे नाव मागे पडले. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक व शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात सामना झाला. महाडिक यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून त्यांच्या विजयासाठी मुश्रीफांनी कंबर कसली होती. त्यावेळी येथील जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी मंडलिकांना ‘ताकद’ दिली होती. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात असतानाच संभाजीराजेंनी जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड.श्रीपतराव शिंदेंची त्यांच्या घरी जावून भेट घेतली होती.
छत्रपती व शिंदे घराण्याचे अतूट ऋणानुबंध असतानाही तुमच्याविरोधात प्रचार केला आणि गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. माझ्याकडून मोठी चूक झाली, मनमोकळं करायला, चुकीची दुरूस्ती करायला आलोय. मला समजून घ्या, अशी विनंती दस्तुरखुद्द संभाजीराजेंनी शिंदे यांना केली होती. निवडणुकीपासून अलिप्त राहिलेल्या संभाजीराजेंनी घेतलेल्या शिंदेंच्या भेटीची त्यावेळी जिल्हाभर चर्चा झाली होती.
गडहिंग्लज शहर आणि तालुक्याशी छत्रपती घराण्याचे घनिष्ठ संबंध आहेत. येथील अनेक कुळांकडे छत्रपती घराण्याची शेतजमीन असून शहरातील काही विकासकामांसाठीही त्यांनी जागा दिली आहे. त्यामुळेच हा ऋणानुबंध अधिक घट्ट झाला आहे. किंबहुना, छत्रपतींचा शब्द प्रमाण मानणारी रयत आणि कार्यकर्ते अजूनही याठिकाणी आहेत. या पार्श्वभूमीवरच ‘छत्रपतीं’च्या आशीर्वादाकरिताच अभिनंदनासाठी चढाओढ झाली आहे.

डिजीटलची ‘जिल्ह्यात’ चर्चा !
गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मुश्रीफ यांनी शिंदे यांच्याशी युती केली. नगरपालिकेत एकमेकांच्या विरोधात असताना झालेली ही युती राष्ट्रवादीच्या ‘काही’ कार्यकर्त्यांना रूचली नाही, त्यामुळे ‘ते’ प्रचारातसुद्धा नावापुरतेच दिसले. गडहिंग्लज पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मुश्रीफांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नसतानाच छत्रपतींच्या अभिनंदनासाठी लागलेल्या डिजीटलची जोरदार चर्चा आहे.

Web Title: SambhajiRaje's 'Congratulations!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.