कोल्हापूर-मुंबई विमानसेवा उद्यापासून, संभाजीराजे यांची माहिती; एअर डेक्कन कंपनीचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:18 PM2018-07-28T12:18:03+5:302018-07-28T12:22:26+5:30
उडान योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर एअर डेक्कन कंपनीची कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाली आणि दोन महिन्यातच बंद पडली. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी ही विमानसेवा सुरू होण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा केला आहे. एअर डेक्कन कंपनीशी चर्चा केली.
कोल्हापूर : उडान योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर एअर डेक्कन कंपनीची कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाली आणि दोन महिन्यातच बंद पडली. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी ही विमानसेवा सुरू होण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा केला आहे. एअर डेक्कन कंपनीशी चर्चा केली. त्यावर कोल्हापूरची विमानसेवा रविवारी (दि. २९) पुन्हा सुरू करणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
नागरिकांच्या चांगल्या प्रतिसादानंतरही एअर डेक्कन कंपनी ‘कोल्हापूर ते मुंबई’ विमानसेवा सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी अपयशी ठरली आहे; त्यामुळे रविवारनंतर जर ही कंपनी आठवड्यातील तीन दिवस विमानसेवा देण्यास असमर्थ ठरली, तर त्यांचा करार रद्द करावा, अशी मागणी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि या खात्याचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांना भेटून त्यांच्याकडे केली.
त्यांनी या मागणीला सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत, जर एअर डेक्कन कंपनीने कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरळीतपणे चालू ठेवली नाही, तर त्यांचा करार रद्द केला जाईल. एअर इंडियाचा उपक्रम असलेल्या अलायंस एअरला कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेचा ठेका दिला जाईल, असे राज्यमंत्री सिन्हा यांनी सांगितले असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
अन्यथा कोल्हापूरसाठी दुसरा पर्याय
अलायंस एअरच्या माध्यमातून एअर इंडिया मोठ्या शहरातून छोट्या शहरात विमानसेवा देते; त्यामुळे जर एअर डेक्कन कंपनीने विमानसेवा देण्यास चाल ढकल केली, तर दुसरा पर्याय अलायंस एअरच्या माध्यमातून कोल्हापूरसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.