संभाजीराजे ‘पर्यटन’चे ब्रँड अॅम्बॅसडर
By admin | Published: September 20, 2016 01:14 AM2016-09-20T01:14:16+5:302016-09-20T01:14:31+5:30
राज्य शासनाकडून निवड : ‘गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पद स्वीकारले’
मुंबई/कोल्हापूर : महाराष्ट्रातील किल्ले व गडांचे संवर्धन करण्यासाठी तसेच वारसास्थळांचे जतन करण्यासाठी वारसास्थळ धोरण आखले जाईल, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत घोषित केले. राज्यातील शिवकालीन किल्ले व गडांचे संवर्धन करण्यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांची ‘पर्यटन दूत’ म्हणून निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी जाहीर केले.
रावल म्हणाले, खासदार छत्रपती संभाजीराजे यांना किल्ले व गडांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे त्यांची ‘पर्यटन दूत’ म्हणून यावेळी निवड करण्यात आली आहे. खासदार संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्रातील इतिहास जगासमोर यावा यासाठी अनेक वर्षे मी काम केले. महाराष्ट्रातील वारसास्थळांचे तसेच इतिहासातील गड व किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी वारसास्थळ जतन धोरण आखणे गरजेचे आहे. यापूर्वी रायगड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ३०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कामे लवकरच पूर्ण होतील.
मुख्यमंत्र्यांनी २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून घोषित केल्याची नांदी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ घोषित करण्यात आला आहे, तसेच पर्यटन संचालनालयाची निर्मिती करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस असल्याने महाराष्ट्राला पर्यटनासाठी स्वतंत्र मंत्री दिला आहे. त्यामुळे आता पर्यटनाचा विकास अधिकाधिक केला जाईल. (प्रतिनिधी)
वेगळा आनंद
छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास जागविणाऱ्या राज्यातील गड-किल्ल्यांचा विकास करणे हे माझे स्वप्न व ध्येय आहे. त्याच्या पूर्ततेसाठीची एक संधी या पर्यटन दूत म्हणून काम करण्यात मिळाली असल्याचा वेगळा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पर्यटनमंत्री रावल यांनी केलेल्या विनंतीनंतर मी ‘पर्यटन दूत’ हे पद स्वीकारण्यास होकार दिला. हे पद मानद स्वरुपातील आहे. राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मी हे पद स्वीकारले आहे. गडकिल्ल्यांचा विकास हा वारसास्थळ जतन धोरणाद्वारे केला जाईल. येत्या तीन महिन्यांत हे धोरण तयार केले जाईल.
कोल्हापूरला
पहिल्यांदाच संधी
युवराज संभाजीराजे यांची तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती झाली. त्यानंतर आता त्यांची ‘राज्याचे पर्यटन दूत’ म्हणून निवड झाली. राज्यातील एका विभागाचे दूत म्हणून काम करण्याची संधी खासदार संभाजीराजे यांच्या माध्यमातून कोल्हापूरला पहिल्यांदाच मिळाली आहे.