एकाच दिवशी तीन बनावट नोटा सापडल्या, शाहूपुरीतील एका बँकेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:21 AM2019-06-13T11:21:04+5:302019-06-13T11:23:38+5:30
शाहूपुरी स्टेशन रोडवरील एका सहकारी बँकेत हिशेबाच्या वेळी दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या तीन बनावट नोटा एकाच दिवशी सापडल्याने खळबळ उडाली आहे. बँक व्यवस्थापकाने नोटा व तक्रार अर्ज शाहूपुरी पोलिसांत दिला आहे. पोलिसांकडून या नोटांची चौकशी सुरूआहे.
कोल्हापूर : शाहूपुरी स्टेशन रोडवरील एका सहकारी बँकेत हिशेबाच्या वेळी दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या तीन बनावट नोटा एकाच दिवशी सापडल्याने खळबळ उडाली आहे. बँक व्यवस्थापकाने नोटा व तक्रार अर्ज शाहूपुरी पोलिसांत दिला आहे. पोलिसांकडून या नोटांची चौकशी सुरूआहे.
बँकेत कॅशियरकडून नोटांची देवाण-घेवाण होत असताना त्या मशीनमध्ये दोन-चार वेळा तपासून घेतल्या जातात. तरीही तीन नोटा एकाच दिवशी मिळून आल्याने कोल्हापुरात बनावट नोटांची उलाढाल मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. बँकेला फसविले जाते तर नागरिकांचे काय? बनावट नोटा रॅकेटचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
शाहूपुरी स्टेशन रोडवरील एका सहकारी बँकेत दोन दिवसांपूर्वी दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या तीन नोटा मिळून आल्या. एकाच दिवशी या नोटा मिळून आल्याने बँक प्रशासन हडबडले. येथील व्यवस्थापकाने या नोटा शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. या नोटांची चौकशी व्हावी म्हणून अर्जही दिला. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच ही बँक आहे.
पोलिसांनी संबंधित नोटांचा तपास सुरूकेला आहे. ज्या दिवशी नोटा मिळून आल्या. त्या दिवशी बँकेत कोणाचे व्यवहार झाले, त्याचे रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती घेत आहेत. आठ दिवसांपूर्वी आणखी एका बँकेत दोन हजाराच्या दोन बनावट नोटा मिळून आल्या होत्या. त्या बँक प्रशासनाने याबाबत पोलिसांत तक्रार दिली. कोल्हापुरातही राजरोस बनावट नोटा छापून त्या चलनात आणल्याने बँक प्रशासनासह नागरिकांत खळबळ उडाली आहे.चौकशीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
दहा नोटा मिळून आल्यानंतर गुन्हा
कोणत्याही बँकेत बनावट नोटा दहा मिळून आल्यानंतर थेट गुन्हा दाखल केला जातो. एक-दोन नोटा मिळून येणे ही नियमित बाब आहे. त्यामुळे शाहूपुरीतील ‘त्या’ बँकेत मिळून आलेल्या नोटांची सखोल चौकशी सुरूआहे, असे येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
वर्षभरात बनावट नोटांचा पाऊस
गेल्या वर्षभरात बनावट नोटा बाजारात मोठ्या प्रमाणात आल्या. दोन हजार, दोनशे व शंभर रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमधील म्होरके विश्वास अण्णाप्पा कोळी (रा. आलास, ता. शिरोळ), जमीर अब्दुलकादर पटेल (रा. बिगी कनवाड, ता. शिरोळ) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून अडीच लाखांच्या बनावट नोटा, संगणक, कलर प्रिंटर्स, बॉँड पेपर्स, आदी साहित्य जप्त केले. या आंतरराष्ट्रीय रॅकेटची व्याप्ती मोठी आहे. महाराष्ट्र-कर्नाटकापर्यंत त्यांचे जाळे पसरले आहे.
गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर मंदिरासमोरील मंडईत भाजी विक्रेत्याला बनावट दोन हजार रुपयांची नोट देणाऱ्या परप्रांतीय तरुणास नागरिकांनी मारहाण केली. गारगोटी येथील एका देशी दारूच्या दुकानात पाचशे रुपयांची नोट खपल्यानंतर बनावट नोटांचा प्लॅन यशस्वी झाल्याची खात्री होताच लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नोटा खपविण्याच्या तयारीत असणाऱ्या संशयित विक्रम कृष्णात माने (रा. बेडिव, ता. भुदरगड) याला अटक केली.
बांबवडेत बनावट नोटांचे मशीन
गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर मंदिरासमोरील मंडईत एका युवतीला भाजी विक्रेत्याला शंभर रुपयांची बनावट नोट देताना नागरिकांनी पकडले होते. या युवतीच्या बहिणीलाही अशा प्रकारे पकडले होते. त्यांच्या बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील नातेवाइकांकडे बनावट नोटा छापण्याचे मशीन आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात संबंधित युवतीवर तक्रार दाखल आहे. पोलीस मुळापर्यंतं गेले तर मोठे रॅकेट पुढे येईल.