भोगावतीचा कारभार -राजीनामा मागे हाच पी.एन. यांच्यासमोर पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 06:45 PM2020-11-11T18:45:48+5:302020-11-11T20:02:32+5:30
bhogawati, sugerfactory, kolhapur, mla, pnpatil परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील यांनी राजीनामा मागे घेवून कारखान्याची सुत्रे सांभाळणे हाच सद्यस्थितीत त्यांच्यासमोरील एकमेव पर्याय आहे. अन्यथा कारखान्यासमोरील अडचणीत वाढतील अशी स्थिती आहे. त्यामुळे ते राजीनामा मागे घेण्याचीच शक्यता बुधवारी ठळक झाली.
कोल्हापूर : परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील यांनी राजीनामा मागे घेवून कारखान्याची सुत्रे सांभाळणे हाच सद्यस्थितीत त्यांच्यासमोरील एकमेव पर्याय आहे. अन्यथा कारखान्यासमोरील अडचणीत वाढतील अशी स्थिती आहे. त्यामुळे ते राजीनामा मागे घेण्याचीच शक्यता बुधवारी ठळक झाली.
कारखान्याच्या व्यापातून अन्य सहकारी संस्था व मतदार संघातील कामांकडे वेळ देता येत नसल्याने आमदार पाटील यांनी मंगळवारी सकाळी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रात खळबळ उडाली. कारखान्याचा हंगाम मंगळवारपासूनच सुरु झाला आहे. त्या तोंडावर राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने सगळेच अस्वस्थ झाले होते. त्यामुळे सत्तारुढ आघा़डीतील सर्व २२ संचालकांनी तुम्ही राजीनामा मागे घेणार नसाल तर आमचेही राजीनामे घ्या म्हणून सर्वांनी आमदार पाटील यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.
कार्यकारी संचालकांनीही राजीनामा दिला आहे. हे राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठविले तर कारखान्यांवर प्रशासक येवू शकतो. तसे व्हायचे नसेल तर आमदार पाटील यांनी राजीनामा मागे घेण्याशिवाय गत्यंतर नाही. कारखान्याची सुत्रे त्यांच्याकडे असल्याने जिल्हा बँकेकडून कारखान्यास भरीव सहकार्य मिळाले आहे. अन्य अनेक कामांमध्ये त्यांच्या नेतृत्वाची कारखान्याचे प्रश्र्न सुटण्यास मदत होत आहे.
सुमारे पंचवीस वर्षे ते कारखान्याच्या सत्तारुढ आघाडीचे नेतृत्व करत आहेत परंतू ते कधीच प्रत्यक्ष निवडणूकीस उभे राहिलेले नव्हते. गतनिवडणूकीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल उभे राहिले. कारखान्याच्या कारभारात ते स्वत: भाग घेणार असल्यानेच सभासदांनी त्यावर विश्र्वास ठेवून काँग्रेसचे पॅनेल विजयी केले. असे असताना मध्येच त्यांनी राजीनामा दिल्यास कारखान्याची घडी विस्कळीत होवू शकते याचा विचार करून त्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागेल असेच सद्याचे चित्र आहे.