साडविलकरविरोधात समीर गायकवाड देणार तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:46 AM2017-11-21T04:46:57+5:302017-11-21T04:47:37+5:30
गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील साक्षीदार संजय अरुण साडविलकर यांच्या विरोधात संशयित आरोपी समीर गायकवाड मंगळवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देणार आहे.
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील साक्षीदार संजय अरुण साडविलकर यांच्या विरोधात संशयित आरोपी समीर गायकवाड मंगळवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देणार आहे. त्यासाठी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांची सोमवारी अर्जाद्वारे मंजुरी घेतली.
पानसरे व दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी मुख्य साक्षीदार साडविलकर यांची ‘इन कॅमेरा’ साक्ष प्रथम वर्ग न्यायाधीश पाटील यांच्यासमोर घेतली होती. त्यामध्ये सन १९८५ ते १९८८पर्यंत गावठी पिस्तूल खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला आहे. साडविलकर यांनी गावठी पिस्तूल कोणाला विकली, त्यातून काही गुन्हा घडला आहे का? त्यासंबंधी समीर गायकवाड याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची आहे. समीरला सांगली शहर सोडून बाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कोल्हापुरात येण्यास परवानगी मिळावी, यासाठी त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांच्याकडे अर्ज सादर केला. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली.