समीर गायकवाडला आज न्यायालयात हजर करणार
By admin | Published: November 7, 2015 12:05 AM2015-11-07T00:05:41+5:302015-11-07T00:14:31+5:30
पानसरे हत्या प्रकरण : दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी अवधी
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली) याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्याला आज, शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्यासमोर हजर केले जाणार आहे.
पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तपासकामात गायकवाड सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांनी सादर केला होता. त्यावर संशयित आरोपीला ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी संमती विचारली असता त्याने त्यास नकार दिला. शनिवारी कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा हजर करण्यात येणार होते. यापूर्वीच्या सुनावणीला त्याला हजर करण्यासाठी कारागृह अधीक्षक सुधीर किंग्रे यांनी तपास अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांच्याशी पत्रव्यवहार केला होता; परंतु चैतन्या यांनी समीरला न्यायालयात हजर करण्यासाठी पुरेसे पोलीस पथक उपलब्ध नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने त्याला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करता येत नाही, अशा विनंतीचे पत्र न्यायालयास दिले होते.