समीर गायकवाडवर आज दोषारोपपत्र दाखल होणार
By Admin | Published: April 11, 2016 12:25 AM2016-04-11T00:25:22+5:302016-04-11T00:31:23+5:30
पोलिस बंदोबस्त : सुनावणीसाठी हजर राहणार
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे खटल्यातील आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात आज, सोमवारी दोषारोप निश्चित करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस समीरला सुनावणीसाठी सशस्त्र पोलिस बंदोबस्तात हजर करणार आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या दालनात सुनावणी होत आहे. यावेळी सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ विशेष सरकारी वकील हर्षल निंबाळकर हे युक्तिवाद मांडणार आहेत.
पानसरे खटल्यातील आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोप निश्चित करण्यासाठी आज दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बिले यांच्या दालनात सुनावणी होत आहे. अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गोपनीय तपास अहवाल सादर केला आहे.
मागील सुनावणीला पोलिसांनी आरोपीला हजर न केल्याने न्यायाधीशांनी तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. तसेच आजच्या सुनावणीला आरोपी हजर राहिला नाही तर ‘शो कॉज’ नोटीस पाठवू,’ असे सुनावले आहे. त्यामुळे पोलिस सशस्त्र बंदोबस्तात समीरला न्यायालयात हजर करणार आहेत. बिले न्यायाधीशांपुढे समीर पहिल्यांदाच हजर राहत आहे.
यावेळी ‘त्याला पोलिसांनी तुझ्या विरोधात केलेले आरोप मान्य आहेत का?’ अशी विचारणा केली जाईल. त्यावर तो काय उत्तर देतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)