समीर गायकवाडच्या अर्जावर झाला युक्तिवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:31+5:302021-04-02T04:25:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे खुनाच्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू झाली आहे. संशयित आरोपी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे खुनाच्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू झाली आहे. संशयित आरोपी समीर गायकवाड याला सुनावणीस गैरहजर राहण्यास परवानगीच्या अर्जावर गुरुवारी युक्तिवाद झाला. याबाबतचा निर्णय दि. १६ एप्रिलला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.
सुनावणीस दिरंगाई होत असल्याने सुनावणीस गैरहजर राहण्याची मागणी समीर गायकवाड यांचे वकील समीर पटवर्धन यांनी मागील तारखेला न्यायालयात केली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे ॲड. राणे यांनी युक्तिवाद केला. याचा निर्णय दि. १६ एप्रिलला होईल. सध्या खटल्याशी संबंधित सर्व संशयित हे वेगवेगळ्या कारागृहांत असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी त्याची माहिती घेत असल्याचेही युक्तिवादात सांगितल्याचे ॲड. राणे यांनी सांगितले. यामुळे आता पानसरे खुनाच्या खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.