समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर २३ ला निर्णय
By admin | Published: March 15, 2016 01:15 AM2016-03-15T01:15:32+5:302016-03-15T01:18:53+5:30
गोविंद पानसरे हत्या प्रकरण : विविध खटल्यांचे दाखले; दोन्ही बाजूंकडून तासभर युक्तिवाद
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर २३ मार्चला निर्णय घेऊ, असे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सांगितले.
सोमवारी गायकवाडच्या जामीन अर्जावर न्यायसंकुलमधील बिले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर व गायकवाडचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांचा तासभर युक्तिवाद झाला. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाड याच्यावर न्यायालयात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. यापूर्वी त्याचे वकील पटवर्धन यांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. म्हणून पटवर्धन यांनी दुसऱ्यांदा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला आहे.
अॅड. पटवर्धन म्हणाले, ‘पानसरे हत्येप्रकरणी न्यायालयात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर हा खटला जलदगतीने सुरू करावा, अशी आमची मागणी आहे. तपास अधिकाऱ्यांनी पानसरे हत्या प्रकरणाचा तपास किती दिवस करावा, यावर आमचा आक्षेप नाही आहे; पण तो किती दिवस सुरू राहणार हे सरकारी पक्षाने सांगितलेले नाही. त्यामुळे समीर गायकवाड किती दिवस कळंबा मध्यवर्ती कारागृहात राहणार असे विचारून, सर्वोच्च न्यायालयातील पप्पू यादव व संजय चंद्र विरुद्ध राज्य सरकार अशा दोन खटल्यांचे दाखले दिले.
पानसरे यांचे स्नेही दिलीप पवार यांनी आपल्या जीवितास धोका आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ते या खटल्यातील पंच साक्षीदार आहेत. त्यांनीसुद्धा गायकवाडचा जामीन अर्ज मंजूर करू नये, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सरकारी पक्षाने मांडलेले मुद्दे यापूर्वीचेच आहेत, असा युक्तिवाद करून, समीर गायकवाडला जामीन मिळावा, अशी विनंती पटवर्धन यांनी केली.
विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर म्हणाले, ‘गायकवाडचा पहिला जामीन अर्ज २८ जानेवारी २०१६ ला जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. गायकवाडला जामीन मिळाल्यास तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलावर व इतर साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, साक्षीदारांना फितूर करू शकतो. समीर हा यापूर्वी मडगाव (गोवा) बॉम्बस्फोटातील संशयित फरार रुद्रगौडा पाटील याचा मित्र होता. त्यामुळे गायकवाडला जामीन मिळाल्यास कदाचित तो रुद्रगौडा पाटीलप्रमाणे फरार होऊ शकतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पानसरे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.’ त्यांनी व्हिक्टर विरुद्ध राज्य सरकार, कऱ्हाड येथील उदय पाटील विरुद्ध राज्य सरकार, शेख अन्वर ऊर्फ शेख बाबर विरुद्ध राज्य सरकार, असे आदी चार खटल्यांचे दाखले देत युक्तिवाद मांडला. दोघांचा युक्तिवाद ऐकून बिले यांनी २३ मार्चला समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. अॅड. निंबाळकर यांना सरकारी वकील अॅड. चंद्रकांत बुधले यांनी, तर अॅड. पटवर्धन यांना अॅड. आनंद देशपांडे, अॅड. संजय धर्माधिकारी, अॅड. श्रीपाद होमकर यांनी सहकार्य केले.
न्यायालयात मेघा पानसरे, एम. बी. पडवळे, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. धनंजय पठाडे उपस्थित होते.
सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेले मुद्दे हे यापूर्वीच मांडले आहेत. तपासांत नवीन काही नाही. त्यामुळे समीर गायकवाड याचा जामीन अर्ज मंजूर करावा.
- अॅड. समीर पटवर्धन,
बचाव पक्षाचे वकील
गोविंद पानसरे हत्येप्रकरणी तपास यंत्रणा मुळापर्यंत जाऊन व कुशल पद्धतीने तपास करीत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास यंत्रणेचे काम सुरू आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करू नये.
- अॅड. हर्षद निंबाळकर,
विशेष सरकारी वकील,