समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Published: January 29, 2016 01:06 AM2016-01-29T01:06:52+5:302016-01-29T01:07:16+5:30

नऊ फेब्रुवारीला पुढील सुनावणी

Sameer Gaikwad's bail application is rejected | समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला

समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी व सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याचा जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांनी गुरुवारी फेटाळला.
सनातन संस्थेशी संबंधित ज्योती कांबळे, अंजली झरकर व सुनील खमितकर हे तिघे या खटल्यातील ‘सनातन’चे साक्षीदार आहेत. या साक्षीदारांना भेटून समीर हा त्यांच्यावर दबाव आणू शकतो, हा मुद्दा न्यायालयाने विचारात घेऊन समीरचा जामीन अर्ज नामंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी ९ फेबु्रवारीला होणार आहे.समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावणी होती. यासाठी सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांच्यासह अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, तर आरोपीचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन व अ‍ॅड. आनंद देशपांडे (सांगली) हे दोघेजण बिले यांच्या न्यायालयात उपस्थित होते. दुपारी समीर गायकवाडचा जामीन अर्ज बिले यांनी फेटाळला. त्यानंतर अ‍ॅड. पटवर्धन यांनी कोणत्या मुद्द्यांच्या आधारे समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला, असा विनंती अर्ज न्यायालयात सादर केला. याबाबत अ‍ॅड. समीर पटवर्धन ा ते म्हणाले, न्यायालयाने समीर गायकवाड याच्याविरोधातील आरोपपत्र निश्चित करावे. या खटल्याचे कामकाज लवकरात लवकर जलद गतीने सुरू व्हावे, अशी आमची मागणी आहे. यानंतर अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी, पानसरे हत्येतील विविध मुद्द्यांचा आधार घेत न्यायालयाने समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला, असे पत्रकारांना सांगितले.
या सुनावणीवेळी मेघा पानसरे, दिलीप पवार, प्रा. उदय नारकर, एम. बी. पडवळे हजर होते.


नेवगी यांचे मोठे सहकार्य
पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याला जामीन मिळू नये यासाठी पानसरे यांचे वैचारिक स्नेही व ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. सरकार पक्षाच्यावतीने भक्कमपणे बाजू मांडली गेली नाही तर गायकवाडला जामीन मिळू शकतो हे त्यांनी ओळखले होते म्हणून पोलीस अधीक्षक व संबंधित यंत्रणेशी बोलून त्यांनी विशेष सरकारी वकील नियुक्तीसाठी आग्रह धरला. त्यामुळेच अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती होऊ शकली.

सनातन संस्थेचे अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी राजारामपुरी पोलिसांना धमकीचे पत्र पाठविले आहे. या पत्रानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात
अ‍ॅड. पुनाळेकर यांच्याविरोधात दाखल झालेला अदखलपात्र
गुन्हा.
फिर्यादी दिलीप पवार यांनी अ‍ॅड. पुनाळेकर यांच्यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र.
मडगाव बॉम्बस्फोटातील संशयित रुद्र पाटील हा फरार आहे. समीर गायकवाड त्याचाच मित्र असल्याने तोही जामीन मिळाल्यानंतर फरार होण्याची शक्यता.
पानसरे खटल्यातील ‘सनातन’चे तीन साक्षीदार ज्योती
कांबळे, अंजली झरकर व सुनील खमितकर या तिघांवर
दबाव आणला जाण्याची
शक्यता.
समीर गायकवाड हा बोलताना सत्य लपवून ठेवतो आहे, असा फॉरेन्सिक सायन्स लॅबने दिलेला अहवाल.
या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व शाळकरी मुलगा याने दिलेल्या जबाबावर अविश्वास दाखविणे हे चुकीचे असल्याचे न्यायालयाचे मत.
दिवसाढवळ्या पानसरेंचा झालेला खून.
सकृतदर्शनी पुरावे.


समीर गायकवाडचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे समीर गायकवाडवर न्यायालयाने आरोप निश्चित करावेत. त्यासाठी हा खटला जलदगतीने व त्वरित सुरू करावा.
- अ‍ॅड. समीर पटवर्धन, आरोपी समीर गायकवाडचे वकील.


राज्य शासनाकडे आम्ही गोविंद पानसरे हत्येसंदर्भात अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाने अ‍ॅड. निंबाळकर यांची या खटल्यासाठी नियुक्ती केली. समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत.
- मेघा पानसरे,
गोविंद पानसरे यांच्या स्नुषा,

Web Title: Sameer Gaikwad's bail application is rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.