समीर गायकवाडवर दोषारोप निश्चितीचा उद्या फैसला
By admin | Published: March 7, 2016 12:59 AM2016-03-07T00:59:31+5:302016-03-07T01:01:49+5:30
संपूर्ण राज्याचे लक्ष : हर्षल निंबाळकर उपस्थित राहणार--पानसरे हत्या खटला
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला अन्यत्र चालविण्याचा मुद्दा निकालात निघाला आहे; त्यामुळे आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोप निश्चितीचा फैसला उद्या, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर होणार आहे. या सुनावणीस ज्येष्ठ सरकारी वकील हर्षल निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तपास यंत्रणांत समन्वय झाल्याने नवे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे, असे असताना आरोप निश्चिती कशी करता येईल, याबाबतीत सत्र न्यायालयास अर्जाद्वारे म्हणणे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तपास यंत्रणेद्वारे दोषारोप निश्चित करू नये, असे म्हणणे सादर केले जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पानसरे खटल्याची सुनावणी कोल्हापूर सोडून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत व्हावी, अशी आरोपी समीर गायकवाड याची मागणी उच्च न्यायालयाकडे होती; परंतु त्याच्या वकिलांनी ही याचिका मागे घेतली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्याने आरोपीविरोधात दि. ८ मार्चला दोषारोपपत्र निश्चित करून खटल्याच्या सुनावणीला सुरुवात केली जाईल, असे सत्र न्यायाधीश बिले यांनी दि. २३ फेब्रुवारीच्या सुनावणीला स्पष्ट केले होते. दरम्यान, दि. २९ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात पानसरे-दाभोलकर सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाबद्दल प्रश्न उपस्थित करून आठ मार्चला आरोप निश्चित करण्यात येतील, असा सत्र न्यायालयाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तपास यंत्रणांमध्ये समन्वय झाल्याने नवे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे, असे असताना आरोप निश्चित कसा काय करता येईल, या बाबतीत सत्र न्यायालयास अर्जाद्वारे म्हणणे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले होते. न्यायालयाच्या या आदेशानुसार तपास यंत्रणेद्वारी दोषारोप निश्चित करू नये, याबाबतीत सत्र न्यायालयात म्हणणे सादर करणार आहे. त्यामुळे उद्या, मंगळवारच्या सुनावणीत कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तपास यंत्रणेद्वारे दोषारोप निश्चित करू नये, असे म्हणणे सादर होणार