समीर गायकवाडची याचिका मागे
By admin | Published: February 19, 2016 01:12 AM2016-02-19T01:12:44+5:302016-02-19T01:12:56+5:30
उच्च न्यायालयाची संमती : खटला अन्यत्र वर्ग करण्याची केली होती विनंती
कोल्हापूर/मुंबई : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला अन्यत्र चालविण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेला याचिका संशयित आरोपी समीर गायकवाड याचे वकील संजीव पुनाळेकर यांनी गुरुवारी मागे घेतली. न्यायाधीश श्रीमती सोंडूर बलदोटा यांच्यापुढे पुनाळेकर यांनी तशी तोंडी विनंती केल्यावर न्यायाधीशांनी त्यास सहमती दिली. या खटल्याची सुनावणी दि. २३ फेब्रुवारीस होणार होती. त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता कोल्हापुरातच होणार हे निश्चित झाले.
खटल्याची सुनावणी निष्पक्षपातीपणे व्हावी, यासाठी तो कोल्हापूरच्या बाहेर चालवावा, अशी याचिका (क्रमांक ८४०/२०१५) संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. दक्षिण शिवाजीनगर, मोती चौक, शनिमारुती मंदिराजवळ, सांगली, सध्या कळंबा कारागृह, कोल्हापूर) याने गतवर्षी दि. १८ डिसेंबरला वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्याची सुनावणी दि. १४ जानेवारी व दि. २ फेब्रुवारीस झाली. दि. २ फेब्रुवारीस झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश साधना जाधव यांनी सरकारी वकिलांच्या तपासातील दिरंगाईवर ताशेरे मारले होते व ‘सॉरी स्टेट आॅफ अफेअर्स...’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पानसरे कुटुंबीयांच्या मागणीनुसार राज्य सरकारने या खटल्यात बाजू मांडण्यासाठी अॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांचीही नियुक्ती केली होती.
उच्च न्यायालयाच्याच रेट्यामुळे पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास एसआयटी, सीबीआय व कर्नाटक सीआयडी या तिन्ही यंत्रणा समन्वयाने करू लागल्या आहेत. त्यांतर्गत बुधवारीच पुण्यात या तिन्ही यंत्रणांचीच बैठक झाली व त्यानुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी कोल्हापुरात येऊन पानसरे हत्येमध्ये वापरलेल्या गोळ््यांच्या पाच पुंगळ््या व पानसरे यांच्या शरीरात मिळाळेली एक गोळी ताब्यात घेतली. त्यामुळे हा तपास आणखी काही दिवस पुढे चालणार हे स्पष्ट झाले. खटल्याची ट्रायल सुनावणी लवकर सुरू होणार नाही हे याचिकाकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी खटला अन्यत्र हलविण्याची याचिकाच तोंडी विनंती करून मागे घेतली. ही सुनावणी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कुठेतरी व्हावी अशी गायकवाड याची मागणी होती. या दाव्यात राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले होते.
हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती..
पानसरे हत्या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने वरिष्ठ वकिलांनी बाजू मांडावी; अशी व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार पुण्याचे ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला नव्हता. तो आदेश गुरुवारी निघाल्याने त्यांच्या नियुक्तीबाबतची संभ्रमावस्थाही दूर झाली.
या खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांचा अथवा कुणाचाच कोणत्याही प्रकारचा संशयितांवर दबाव नव्हता. त्यामुळे हा खटला कोल्हापूरच्या बाहेर चालविण्याच्या मागणीस आमचा विरोध होता. आता त्यांनी स्वत:च याचिका मागे घेतल्याने त्यातील संदिग्धता आणि न्यायालयीन लढाई थोडी कमी झाली.
- मेघा पानसरे
पुंगळ्या, गोळी
सीबीआयच्या ताब्यात
अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी घटनास्थळावरून जप्त केलेल्या पाच पुंगळ्या व डॉक्टरांनी पानसरे यांच्या अवयवांमधून काढण्यात आलेली एक गोळी गुरुवारी नवी मुंबई येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या पथकाला देण्यात आली. बंद लखोट्यामधून पुंगळ्या व गोळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी पथकाच्या ताब्यात दिल्या.
‘त्या’ शाळकरी मुलाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ
गोविंंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या ‘त्या’ शाळकरी मुलाच्या सुरक्षिततेत पोलिसांनी वाढ केली आहे. पूर्वी एक पोलीस कॉन्स्टेबल या मुलाच्या सुरक्षिततेसाठी होता. आता एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी असे चौघेजण त्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने तैनात केले आहेत.