समीरची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
By admin | Published: April 16, 2016 12:48 AM2016-04-16T00:48:25+5:302016-04-16T00:49:19+5:30
त्यामुळे दहा दिवसांपूर्वी त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा दोनवेळा दाखल केलेला जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्याने त्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने दाखल केलेल्या अर्जावर सोमवार (दि. १८) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ढेरे यांच्यासमोर सुनावणी होत आहे. पानसरे हत्येप्रकरणी दि. १४ डिसेंबर २०१५ रोजी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीर गायकवाडवर दोषारोपपत्र दाखल झाले. पोलिसांनी समीरविरोधात ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केल्याने हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग केला. त्यानंतर समीरचे वकील एस. व्ही. पटवर्धन यांनी दि. १८ जानेवारीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला. त्यावर तपासी अधिकारी चैतन्या एस. व सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी अभिप्राय दिला. त्याचबरोबर विशेष सरकारी वकील हर्षल निंबाळकर यांनीही युक्तिवाद मांडला. न्यायाधीश बिले यांनी समीरचा दोनवेळा दाखल झालेला अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. सोमवारच्या सुनावणीमध्ये त्याच्या बाजूने हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर बाजू मांडणार आहेत. या अर्जावरील सुनावणीनंतर समीरवर दोषारोपपत्र (चार्ज फ्रेम) करा, अशी मागणी सत्र न्यायालयास करणार असल्याचे अॅड. समीर पटवर्धन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)