अपहृत गुंड समीर नायकवडीची ‘गेम’
By Admin | Published: October 6, 2015 12:15 AM2015-10-06T00:15:56+5:302015-10-06T00:25:15+5:30
आष्ट्यात खळबळ : चौघे हल्लेखोर गजाआड; विहिरीत फेकला मृतदेह
आष्टा : येथील गुंड समीर मुस्तफा सय्यद ऊर्फ नायकवडी (वय २४, सध्या रा. पेठवडगाव) याचा छातीवर चाकूने सपासप वार करून शनिवारी रात्री दहा वाजता खून करण्यात आल्याचे सोमवारी उघड झाले. खुनानंतर आष्टा-कारंदवाडी रस्त्यावरील महावीर आवटी यांच्या शेतातील विहिरीत फेकून दिलेला त्याचा मृतदेह दुपारी दोन वाजता मिळाला.
याप्रकरणी संग्राम रघुनाथ मोरे (२६, रा. कासार गल्ली, आष्टा), शहेनशहा यासीन मुजावर (२५, रा. परीट गल्ली, आष्टा), आकाश अरविंद पवार (२१, रा. हिरुगडे गल्ली, आष्टा) व आकाश भीमराव वर्णे (२४, रा. डांगे महाविद्यालयाजवळ, आष्टा) या संशयितांना अटक करण्यात आली आहे.
येथील गुंड समीर नायकवडीविरुद्ध खंडणी, मारामारी, दहशत निर्माण करणे असे गुन्हे पोलिसांत दाखल आहेत. दररोजच्या भांडणामुळे व गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्याची आई व तो आठ महिन्यांपूर्वी वडगावला वास्तव्यास गेले होते, तरीही तो मित्रांना भेटण्यासाठी आष्ट्यात येत असे. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. बहीण शासकीय नोकरीत वरिष्ठ पदावर आहे.
समीरची व येथील अमित खंडागळे याची मैत्री होती. दोघे नेहमी सोबत असत. डिसेंबर २०१३ मध्ये संग्राम मोरे, लखन हाबळे, शहेनशहा मुजावर, आकाश पवार यांनी मुलीच्या प्रकरणावरून समीरला मारहाण केली होती. तेव्हापासून समीर व संबंधित तरुणांमध्ये वैर निर्माण झाले होते. शनिवारी समीर आष्टा येथे आला होता. त्याने अमित खंडागळेसोबत गाड्यावर चायनीज पदार्थ खाल्ले. मात्र त्याचवेळी तेथे आलेल्या अशरफ देसाई या तरुणाने समीरला शिवीगाळ केली, त्यामुळे समीरने अशरफच्या श्रीमुखात लगावली. अशरफने ही घटना संग्राम मोरे व आकाश पवार यांना जाऊन सांगितली. काही वेळाने संग्राम मोरे, आकाश पवार व इतर तरुण समीरला शोधत आहेत, असे समजल्यानंतर (पान १ वरून) अमितने रात्री साडेनऊ वाजता हॉटेल जाणता राजासमोर जाऊन ही माहिती समीरला दिली. समीर लगेच दुचाकीवरून भरधाव वेगात गणपती मंदिरानजीक जाब विचारण्यासाठी गेला. समीर गणपती मंदिरानजीक परिट गल्लीत आल्याचे समजल्यानंतर संग्राम मोरे, शहेनशहा मुजावर, आकाश पवार, आकाश वर्णे यांनी त्याला गाठले. त्याला दुचाकीवरून खाली पाडून छातीवर व पोटात धारदार चाकूने १५ ते २० वार केले. समीर जागीच ठार झाला. त्याला फरफटत उचलून घेऊन संग्राम मोरे, शहेनशहा मुजावर व आकाश पवार यांनी दुचाकीवर बसवले. गणपती मंदिर, मिरज वेस, यल्लम्मा मंदिरमार्गे आष्टा- कारंदवाडी रस्त्यावर मळीभागातील महावीर आवटी (मिरजवाडी) यांच्या शेतातील रस्त्याकडेच्या विहिरीत समीरचा मृतदेह फेकून दिला. तेथून सर्वजण फरारी झाले. ते जयसिंगपूर, सांगली येथे गेले व रात्री झोपण्यासाठी आष्टा-वाळवा रस्त्यावरील बिरोबा मंदिरात आले.
दरम्यान, आष्टा पोलिसांना समीरवर हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सांगली, जयसिंगपूर, हातकणंगले येथे पोलीस पथके पाठवून शोध घेतला. त्यानंतर रविवारी येथील बिरोबा मंदिरात त्यांना पकडण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून आष्टा-कारंदवाडी रस्त्यावरील विहिरीत समीरचा मृतदेह शोधण्यास सोमवारी सकाळी नऊपासून सुरुवात केली.
विहिरीवर युवकांच्या गर्दीमुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. अखेर दुपारी पावणेदोनच्या दरम्यान समीरचा मृतदेह ६० फूट विहिरीतून गळ टाकून वर काढण्यात आला. विहीर काठोकाठ भरल्याने मृतदेह काढण्यास विलंब लागला. संग्राम मोरे याने घटनास्थळी येऊन दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, सहायक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, पोलीस उपनिरीक्षक जहॉँगीर शेख, सहायक फौजदार पी. बी. भोमरे, पोलीस नाईक सुधीर साळुंखे, पोलीस हवालदार मुकुंद कुडेकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. खुनाचा छडा तातडीने लावल्याबद्दल आष्टा पोलिसांचे अभिनंदन होत आहे. (वार्ताहर)
सर्वांचीच पार्श्वभूमी गुन्हेगारीची
संग्राम मोरे याचा भाऊही खुनाच्या गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे. संग्रामविरुद्ध जबरी चोरी, दुखापत, मारामारीचे गुन्हे नोंद आहेत. शहेनशहा याच्याविरुद्ध गर्दी, मारामारीचे, तर आकाश पवार व आकाश वर्णे यांच्याविरुद्ध मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.
चौघांना इस्लामपूर न्यायालयासमोर उभे केले असता दि. ८ अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.