समीरचा पानसरे हत्येत सहभाग
By admin | Published: September 24, 2015 01:09 AM2015-09-24T01:09:06+5:302015-09-24T01:12:37+5:30
सरकारी वकिलांचा युक्तिवाद : शनिवारपर्यंत पोलीस कोठडी; कडेकोट बंदोबस्त; न्यायालय आवारात तणाव वकिलांचा युक्तिवाद : शनिवारपर्यंत पोलीस कोठडी; कडेकोट बंदोबस्त; न्यायालय आवारात तणाव
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये संशयित ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड
(वय ३२, रा. सांगली) याचा सहभाग असल्याचे मोबाईलच्या संभाषणावरून स्पष्ट झाले असल्याचे सरकारी वकिलांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. समीर गायकवाड याला शनिवारपर्यंत (दि. २६) पोलीस कोठडीतच ठेवण्याचा निर्णय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अपर्णा कुमार जैनापुरे यांनी दिला. प्रचंड पोलीस बंदोबस्त व अत्यंत तणावाच्या वातावरणात ही प्रक्रिया झाली.
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी म्हणून समीर गायकवाड याला सांगलीतच गेल्या बुधवारी (दि. १६ सप्टेंबर) कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्याची कोठडी बुधवारी संपल्यामुळे
दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात चेहऱ्यावर काळा बुरखा घालून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालय खचाखच भरले होते.
समीरकडून मोबाईलची ३१ सीमकार्ड जप्त केली आहेत. त्यावरून त्याने कोणाशी आणि कधी संपर्क साधला, त्याबद्दल तपास करायचा आहे; त्यामुळे समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी केली. मुख्य तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी न्यायालयाकडे केस डायरी आणि रिमांड रिपोर्ट सादर केला. ते म्हणाले, संशयित आरोपी समीरला घटनास्थळी तपासासाठी घेऊन जायचे आहे. तो पोलीस कोठडीत असतानाही तपासकामात सहकार्य करीत नसल्याने आणखी तपास करण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्यावी.
संशयित गायकवाड याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी समीर हा निर्दोष असल्याची बाजू न्यायालयात मांडली. पानसरे यांची हत्या झाली त्यावेळी समीर याचे मोबाईल लोकेशन ठाणे येथे दाखवीत असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. समीरच्या कॉलचे व्हॉईस रेकॉर्डिंग तपासणीसाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची आवश्यकता नाही, असे म्हणणे पुनाळेकर यांनी मांडले.
न्यायाधीशांनी समीरला काही प्रश्न विचारले. त्यानंतर सरकारी वकील बुधले यांनी पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी युक्तिवाद केला.
पानसरे यांच्या हत्येच्या घटनेचे तपशील सविस्तर सांगितले. या हत्येप्रकरणी तपास करताना संशयित आरोपी गायकवाड याचा महिलेबरोबर वारंवार संपर्क होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्या हालचालींवर गोपनीय नजर ठेवली. त्यामध्ये समीरचा पानसरे यांच्या खुनामध्ये सहभाग असल्याची संभाषण झाल्याचे आढळल्याने त्यास संशयावरून अटक केली असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेवून न्यायाधिशांनी गायकवाड याला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दरम्यान, तपासी अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनीही, प्रशासनाची बाजू मांडताना केस डायरी आणि रिमांड रिपोर्ट हजर केल्याचे न्यायमूर्ती अपर्णा जैनापुरे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच समीर गायकवाडच्या मोबाईल कॉल डिटेल्सच्या काही बाजूंची अद्याप तपासणी करणे बाकी आहे. तसेच काही घटनास्थळी समीरला तपासासाठी नेणे बाकी आहे.
समीर पोलीस कोठडीत असताना तपासकामी पोलिसांना तो सहकार्य करीत नाही, तर न्यायालयीन कोठडीत तो पोलिसांना अजिबात सहकार्य करणार नाही. त्यामुळे त्याला कायदेशीरदृष्ट्या जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली.
काळा बुरखा घालून समीरचा प्रवेश
दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जैनापुरे यांचे कामकाज सुरू असताना वकील, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिसांनी न्यायालय खचाखच भरले असताना तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या तसेच पोलीस निरीक्षक विकास धस, दिनकर मोहिते, महावीर सकळे, आदी पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी समीरच्या चेहऱ्यावर काळा बुरखा घालून त्याला २.५० ला न्यायालयात आणले. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील काळा बुरखा न्यायमूर्तींसमोर काढला.
समीर निर्विकार...
समीर गायकवाड याला न्यायालयात आणल्यानंतर त्याला न्यायमूर्तींसमोर हजर केले. त्याच्या चेहऱ्यावरील काळा बुरखा काढण्यात आला, तेव्हा त्याने प्रथम भांबावलेल्या नजरेने न्यायालयात चारीही बाजूंना पाहिले. त्यावेळी त्याला पोलीस, वकील, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी न्यायमूर्तींचा कक्ष खचाखच भरलेला दिसला. त्यानंतर त्याच्या बाजूने वकील उभारले असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर मात्र त्याचा चेहरा पूर्णत: निर्विकार होता. उजव्या बाजूला केसांचे वळण घेतलेली त्याची तगडी देहयष्टी सर्वांच्या निदर्शनास आली. त्याने गडद निळ्या रंगाची कॉलर असलेला स्काय ब्लू रंगाचा टी-शर्ट, तर काळी पँट, पायांत सँडेल असा गणवेश परिधान केला होता. न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतरही त्याचा चेहरा पूर्णत: निर्विकार दिसत होता. न्यायालयीन कामकाज सुरू असताना त्याची नजर पूर्ण न्यायालयाच्या खोलीत भिरभिरत होती.
‘सनातन’कडून वकिलांची फौज
संशयित समीर गायकवाड याच्यावतीने कोल्हापूर बार असोसिएशनने वकीलपत्र न घेता बहिष्कार टाकल्याने सनातन संस्थेकडून बाहेरच्या शहरातील वकिलांची फौज न्यायालयात आली होती. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी समीरच्या वतीने बाजू मांडली.
न्यायालयात समीरशी पाच मिनिटे चर्चा करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी समीरचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी केली. त्यावेळी न्यायमूर्ती अपर्णा जैनापुरे यांनी लेखी मागणी करावी, असे सांगितले. त्यानुसार लेखी मागणी वकिलांनी केली. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर तपासी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अॅड. पुनाळेकर यांनी समीर गायकवाड याच्याशी चर्चा केली.
दोन्ही गटांचे कार्यकर्ते न्यायालयात
पोलीस कोठडी संपल्याने बुधवारी समीर गायकवाड याला न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार असल्याने वकिलांच्या फौजेसह मधुकर नाझरे, डॉ. मानसिंग शिंदे, प्रीतम पवार, शिवानंद स्वामी, राजन बुणगे, किरण कुलकर्णी, विजय गुळवे आदी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते, तसेच डाव्या चळवळीतीलही कॉ. दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, अॅड. मिलिंद यादव, कॉ. मिलिंद कदम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.