समीरला कोल्हापुरात फिरविले
By Admin | Published: September 21, 2015 10:49 PM2015-09-21T22:49:05+5:302015-09-21T23:56:36+5:30
वकिलांनी घेतली भेट : तपासात कमालीची गोपनीयता
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित समीर गायकवाड याला कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी दुपारी गोपनीयरीत्या कोल्हापूर शहरात काही ठिकाणी फिरविले. दरम्यान, न्यायालयाच्या परवानगीनुसार हिंदुत्ववादी संघटनेचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अॅड. प्रीती पाटील यांनी समीर गायकवाड याची भेट घेऊन त्याच्याशी सुमारे १५ मिनिटे चर्चा केली शिवाय बंगलोर येथील सीआयडीचे अधिकारी राजशेखर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन धारवाड येथील एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत गायकवाड याचे काही कनेक्शन आहे का? याबाबत चर्चा केली.
कॉ. पानसरे यांच्या हत्येसंदर्भात कोल्हापूर पोलिसांनी तपासाबाबत अत्यंत गोपनीयता पाळली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात काही मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे या तपासाची सूत्रे दिली आहेत. या पथकांमार्फत तपासाबाबत अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे. प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांना काही टप्प्यांपर्यंतच माहिती काढण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
सोमवारी सकाळी हिंदुत्ववादी संघटनेचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अॅड. प्रीती पाटील यांनी जिल्हा न्यायालयाची लेखी परवानगी घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करून संशयित समीर गायकवाड याच्याशी १५ मिनिटे चर्चा केली. दरम्यान, एनआयए आणि कर्नाटक पोलिसांचे पथक अद्याप कोल्हापुरात तळ ठोकून आहेत.
कोल्हापूर पोलिसांच्या तपास पथकाने दुपारी अत्यंत गोपनीयरीत्या समीर गायकवाड याला खासगी गाडीतून कोल्हापुरातील काही घटनास्थळी फिरविले. पानसरे यांचे संशयित मारेकरी दुचाकीवरून ज्या मार्गावरून गेल्याचे सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसून आले, त्या मार्गावरून समीरला फिरवल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)
कलबुर्गी हत्येशी धागेदोरे मिळते-जुळते
बंगलोर येथील सीआयडी पथकाचे राजशेखर यांनी पोलीस अधीक्षक शर्मा यांची भेट घेतली तसेच अटकेतील समीर गायकवाड याचीही त्यांनी कसून चौकशी केली. डॉ. शर्मा यांच्याशी चर्चा करताना धारवाड येथील एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत समीर गायकवाड याचे काही कनेक्शन आहे का? याबाबत चर्चा केली तसेच कलबुर्गी आणि पानसरे यांच्या हत्येबाबत काही तपासाचे धागेदोरे मिळते-जुळते असल्याची माहिती मिळाली. त्याबाबतही त्यांनी चर्चा करून माहिती घेतली पण या चर्चेबाबतचा तपशील मात्र त्यांनी गोपनीय ठेवला आहे.
कोल्हापुरातील हिंदुत्ववाद्यांची चौकशी
दरम्यान, सोमवारी दिवसभर कोल्हापुरातील काही कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची पानसरे हत्येप्रकरणी चौकशी करण्यात आली. समीर गायकवाड याचे कोल्हापुरातील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी संबंध आहेत का? संशयित समीर गायकवाडने कोल्हापुरात येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची काही मदत घेतली आहे का? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.