समीरच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय शुक्रवारी
By admin | Published: October 7, 2015 12:32 AM2015-10-07T00:32:33+5:302015-10-07T00:33:09+5:30
१२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तपासकामात गायकवाड सहकार्य करत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग तपासणीचा अंतिम निर्णय शुक्रवारी दिला जाईल, असे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी मंगळवारी सांगितले. गायकवाड याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर त्याला न्यायालयात हजर करून ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी संमती आहे किंवा नाही, अशी विचारणा केली जाईल. तो न्यायमूर्तींसमोर येऊन काय सांगतो, त्यावर पुढील दिशा ठरणार आहे. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तपासकामात गायकवाड सहकार्य करत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांतर्फे न्यायालयाकडे सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी सादर केला होता. त्यावर तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी, या गुन्ह्णाच्या पुढील तपासासाठी शास्त्रीय पद्धती वापरणे गरजेचे आहे. ही संधी मिळाली पाहिजे. यामध्ये आरोपीला कोणतीही इजा होत नाही; त्यामुळे त्याची ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती तर आरोपीचे वकील अॅड. एम. एम. सुहासे यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या सेल्वी अॅन्ड आदर्स, स्टेट आॅफ कर्नाटक, दि. ५ मे २०१० च्या निर्णयाप्रमाणे आरोपी हा चाचणी करून घेण्यास इच्छुक आहे का? तसेच चाचणी करून घेण्यास त्याची संमती आहे का? या गोष्टी न्यायमूर्तींनी विचारात घ्याव्यात. त्यानंतर ब्रेन मॅपिंगची परवानगी द्यावी, असे म्हणणे मांडले होते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायमूर्ती डांगे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संशयित आरोपीला ब्रेन मॅपिंग चाचणी करून घ्यावयाची आहे की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. ९) दुपारी समीर गायकवाड यास न्यायालयात हजर करावे, तसे पत्र कारागृह अधीक्षकांना देण्यात यावे, अशा सूचना पोलिसांना केल्या. त्यानुसार शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये न्यायालयीन कोठडी व बे्रन मॅपिंग या दोन्ही निर्णयांंकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी न्यायालयात मेघा पानसरे यांच्यासह वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)