समीरचा पानसरे हत्येत सहभाग ?
By admin | Published: September 24, 2015 12:21 AM2015-09-24T00:21:14+5:302015-09-24T00:24:10+5:30
सरकारी वकिलांचा युक्तिवाद : शनिवारपर्यंत पोलीस कोठडी; ‘सनातन’तर्फे वकिलांची फौज
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये संशयित ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली) याचा थेट सहभाग असल्याचे मोबाईलवरील संभाषणावरून स्पष्ट झाले असल्याचे सरकारी वकिलांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. समीर गायकवाड याला शनिवारपर्यंत (दि. २६) पोलीस कोठडीतच ठेवण्याचा निर्णय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अपर्णा कुमार जैनापुरे यांनी दिला. प्रचंड पोलीस बंदोबस्त व अत्यंत तणावाच्या वातावरणात ही प्रक्रिया झाली.
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी म्हणून समीर गायकवाड याला सांगलीतच गेल्या बुधवारी (दि. १६ सप्टेंबर) कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात चेहऱ्यावर काळा बुरखा घालून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालय खचाखच भरले होते. समीरकडून मोबाईलची ३१ सीमकार्ड जप्त केली आहेत. त्यावरून त्याने कोणाशी आणि कधी संपर्क साधला, त्याबद्दल तपास करायचा आहे; त्यामुळे गायकवाड याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी केली. मुख्य तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी न्यायालयाकडे केस डायरी आणि रिमांड रिपोर्ट सादर केला. ते म्हणाले, संशयित आरोपी समीरला घटनास्थळी तपासासाठी घेऊन जायचे आहे. तो पोलीस कोठडीत असतानाही तपासकामात सहकार्य करीत नसल्याने आणखी तपास करण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्यावी.
संशयित गायकवाड याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी समीर हा निर्दोष असल्याची बाजू न्यायालयात मांडली. पानसरे यांची हत्या झाली त्यावेळी समीर याचे मोबाईल लोकेशन ठाणे येथे दाखवीत असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. समीरच्या कॉलचे व्हॉईस रेकॉर्डिंग तपासणीसाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची आवश्यकता नाही, असे म्हणणे पुनाळकर यांनी मांडले. न्यायाधिशांनी समीरला काही प्रश्न विचारले. त्यानंतर सरकारी वकील बुधले यांनी पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी युक्तिवाद केला. पानसरे यांच्या हत्येच्या घटनेचे तपशील सविस्तर सांगितले. या हत्येप्रकरणी तपास करताना संशयित आरोपी गायकवाड याचा महिलेबरोबर वारंवार संपर्क होत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार त्याच्या हालचालींवर गोपनीय नजर ठेवली. त्यामध्ये समीरचा पानसरे यांच्या खुनामध्ये सहभाग असल्याची संभाषण झाल्याचे आढळल्याने त्यास संशयावरून अटक केली असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेवून न्यायाधिशांनी गायकवाड याला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)
सरकारी वकिलांनी मांडलेला युक्तीवाद
समीर आणि त्याची मैत्रीण ज्योती कांबळे यांच्यात होणाऱ्या संभाषणावरून त्याचा पानसरे यांच्या हत्येत सहभाग असल्याचा उलगडा झाला आहे. पोलिसांच्या तपासात मडगाव बॉम्बस्फोटातील रुद्रगौडा पाटील याच्याशी समीरचा संबंध असल्याचे उघड. अंजली ही समीरची बहीण असून, तिच्याशी झालेल्या संभाषणावरूनही त्याचा हत्येत सहभाग असल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. तपास करताना समीरच्या सांगलीतील घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांच्या हाती मोबाईलची ३१ सीमकार्ड लागली. ती त्यांनी जप्त केली. या ३१ सीमकार्डांचा तपास करायचा आहे. त्यावरून त्याने कोणाशी, कधी व कशासाठी संपर्क साधला आहे, याबद्दल तपास करणे अद्याप बाकी आहे; त्यामुळे समीरच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी. समीर हा पोलिसांना तपासकामात सहकार्य करीत नाही. समीरच्या चौकशीवेळी बचावपक्षाच्या वकिलांना उपस्थित राहण्याची मुभा असल्याने तपासकामांत अडथळे येत आहेत. समीरच्या आवाजाचे नमुने मुंबईतील फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. गुजरात लॅबचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. रुद्रगौडा पाटील आणि समीर गायकवाड गेल्या अनेक महिन्यांपासून संपर्कात असल्याचा तपास पथकाचा दावा आहे.