समीरच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय मंगळवारी

By admin | Published: October 4, 2015 01:08 AM2015-10-04T01:08:28+5:302015-10-04T01:08:28+5:30

गोविंद पानसरेहत्या प्रकरण

Sameer's decision to brain mapping on Tuesday | समीरच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय मंगळवारी

समीरच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय मंगळवारी

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग तपासणीसंबंधी निर्णयाची सुनावणी मंगळवारी (दि. ६) ठेवण्यात आली. ब्रेन मॅपिंग तपासणीवर दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी हा निर्णय शनिवारी दिला.
तपासकामात समीर गायकवाड सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांतर्फे न्यायालयाकडे सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी केला होता. त्यावर शनिवारी सुनावणी झाली. यावेळी तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी संशयित आरोपी समीर गायकवाड याने बारा दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केलेली नाही. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी शास्त्रीय पद्धती वापरणे गरजेचे आहे. ही संधी मिळाली पाहिजे. यामध्ये आरोपीला कोणतीही इजा होत नाही; त्यामुळे त्याची ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती केली.
त्यानंतर सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी गुन्ह्याची संपूर्ण हकीकत सांगून आजपर्यंतचा तपास न्यायमूर्र्तींसमोर विषद केला. समीर गायकवाड याचा ज्योती कांबळेशी मोबाईलवरून संवाद होत होता. त्याची गोपनीयरीत्या माहिती मिळविली असता दोघांच्या संभाषणामध्ये समीर हा पानसरे यांच्या खुनासंदर्भात बोलत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त केले. त्याच्या सांगली येथील घरातून २३ मोबाईल, चाकू, डायरी व सनातन धर्माविषयी पुस्तके मिळाली. या वस्तूबांबत तो समाधानकारक उत्तरे देत नाही. समीरने ज्योती कांबळे हिच्यासोबत पानसरे हत्येसंदर्भात संभाषण झाल्याची कबुली दिली आहे; परंतु हे तो चेष्टेने बोललो असल्याचे सांगत आहे. तो चेष्टेने बोलला हे अविश्वसनीय आहे. पानसरे यांचेच नाव का घेतले आणि तेसुद्धा दोन वेळा. तसेच चौकशी सुरू असताना ‘पानसरे कोण?’ असा उलट प्रश्न त्याने पोलिसांना केला होता. चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी उत्तरे तो देत आहे. त्याच्या मानसशास्त्रीय वर्तनाची चाचणी घेतली असता ती फसवी निघाली आहे. पोलिसांनी त्याचे ध्वनिमुद्रित केलेले संभाषण आणि समीर व ज्योतीच्या आवाजाचे नमुने घेतले. बारा दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये आरोपीने वाहन, हत्यारे, त्याचे इतर साथीदार यांची माहिती दिली नाही. ती त्याने टाळली म्हणून पूरक पुरावा प्राप्त करण्यासाठी ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्याचे तपासी अधिकाऱ्यांनी ठरविले आहे. त्याला परवानगी द्यावी, असा युक्तिवाद त्यांनी मांडला. दरम्यान, संशयित आरोपीचे वकील अ‍ॅड. एम. एम. सुहासे यांनी सर्वोच्च न्यायालयाने सेल्वी अ‍ॅँड आॅदर्स, स्टेट आॅफ कर्नाटक, दि. ५ मे २०१० च्या निर्णयाप्रमाणे आरोपी हा चाचणी करून घेण्यास इच्छुक आहे का? तसेच चाचणी करून घेण्यास त्याची संमती आहे का? या गोष्टी न्यायमूर्तींनी विचारात घ्याव्यात. त्यानंतर ब्रेन मॅपिंगची परवानगी द्यावी, असे म्हणणे मांडले. त्यानंतर फिर्यादीचे खासगी वकील अ‍ॅड. विवेक घाटगे, प्रकाश मोरे यांनीही बाजू मांडली. यावेळी दोन्हीही बाजंूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डांगे यांनी संशयित आरोपी गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीबाबत मंगळवारी (दि. ६) अंतिम सुनावणी ठेवली. ही सुनावणी ऐकण्यास पानसरे यांच्या कुटुंबीयांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
समीर हजर राहणार
ब्रेन मॅपिंग चाचणीची सुनावणी ६ आॅक्टोबर रोजी आहे. त्यादिवशी समीर स्वत: न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे. यावेळी त्याला ‘ब्रेन मॅपिंग चाचणीला तुझी संमती आहे का?’ अशी विचारणा केली जाईल. यावेळी त्याने नकार दर्शविल्यास हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याची चर्चा न्यायालय परिसरात होती. त्यामुळे तो कोणता निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sameer's decision to brain mapping on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.