समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

By admin | Published: October 24, 2015 01:00 AM2015-10-24T01:00:01+5:302015-10-24T01:06:40+5:30

१२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली.

Sameer's judicial custody extended | समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली) याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत दि. ७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली. शुक्रवारी त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी पानसरे हत्येच्या तपासासाठी समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी, अशी विनंती केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी हा आदेश दिला.
पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तपासकामात गायकवाड सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांनी सादर केला होता. त्यावर न्यायमूर्ती डांगे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संशयित आरोपीला ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी संमती विचारली असता त्याने त्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांचा अर्ज फेटाळून लावीत गायकवाड याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा हजर करण्यात येणार होते. त्यानुसार दुपारी अडीच वाजता आरोपीचे वकील एम. एम. सुहासे, समीर पटवर्धन तसेच सरकारी वकील चंद्रकांत बुधले हे उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पानसरे हत्येचा तपास अपुरा असून, आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी, अशी विनंती केली. स्वत: आरोपी न्यायालयात हजर नसल्याने दोन्ही वकिलांनी युक्तिवाद मांडला नाही. त्यामुळे न्यायमूर्ती डांगे यांनी आरोपीला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
ओळख परेडचा अहवाल पोलिसांना सादर
संशयित आरोपी समीर गायकवाडची ओळख परेड करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्यासमोर कळंबा मध्यवर्ती कारागृहात झाली. यावेळी पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे, त्यांची मोलकरीण, शेजारी राहणारी व्यक्ती व शाळकरी मुलगा अशा चौघांसमोर ही ओळख परेड झाली. समीरसह बारा संशयितांना समोर उभे केले होते. यावेळी उमा पानसरे, मोलकरीण व शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने येथे तो माणूस उपस्थित नाही, असा जबाब दिला; परंतु चौदा वर्षांच्या मुलाने मात्र बारा संशयितांच्या चेहऱ्यावर नजर फिरवीत समीरवर रोखली आणि त्याच्या दिशेने बोट करून ‘हाच तो मारेकरी’ म्हणून ओळखले होते. या संपूर्ण ओळख परेडचा अहवाल तहसीलदार डॉ. खरमाटे यांनी बंद लखोट्यातून न्यायालयास सादर केला होता. तो अहवाल न्यायाधीश डांगे यांनी पोलिसांना दिला. हा अहवाल पोलीस दोषारोपपत्रामध्ये जोडणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)

समीरच्या गैरहजेरीत सुनावणी
समीर गायकवाड हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहे. शुक्रवारी त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यासाठी कारागृह अधीक्षक सुधीर किंग्रे यांनी तपास अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.
परंतु चैतन्या यांनी समीरला न्यायालयात हजर करण्यासाठी पुरेसे पोलीस पथक उपलब्ध नाही.
त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करता येत नाही, अशा विनंतीचे पत्र न्यायालयासह कारागृह प्रशासनास दिले होते. त्यामुळे समीरच्या गैरहजेरीत न्यायालयीन कोठडीची मुदतवाढ देण्यात आली.

Web Title: Sameer's judicial custody extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.