समीरची दुसऱ्यांदा सीबीआय चौकशी

By admin | Published: April 15, 2016 11:23 PM2016-04-15T23:23:40+5:302016-04-16T00:43:40+5:30

पानसरे हत्येप्रकरणातील संशयित

Sameer's second CBI inquiry | समीरची दुसऱ्यांदा सीबीआय चौकशी

समीरची दुसऱ्यांदा सीबीआय चौकशी

Next

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाने (सीबीआय) कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी दुसऱ्यांदा पानसरे हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्याकडे कसून चौकशी केली. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांच्या कक्षात समीरवर सुमारे दीड तास प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास ‘सीबीआय’ने करावा, यासाठी हमीद दाभोलकर यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करत आहे. काही महिन्यांपूर्वी ‘सीबीआय’ने दिलेल्या अहवालामध्ये डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे व डॉ. कलबुर्गी या तिन्ही हत्या एकाच विचारांच्या व्यक्तीने केल्या आहेत तसेच एकाच पिस्तुलाने झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार ‘सीबीआय’ ने समीर गायकवाडची बुधवारी (दि. १३) कारागृहात तीन तास चौकशी केली. शुक्रवारी पुन्हा सीबीआयचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. आर. सिंग यांचे पथक सकाळी नऊ वाजता कारागृहात दाखल झाले. समीरची कारागृह अधीक्षक शेळके यांच्या कक्षामध्ये त्याच्याकडे दीड तास चौकशी केली. यावेळी दाभोलकर व कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मडगाव (गोवा) बॉम्बस्फोटातील मुख्य संशयित आरोपी रूद्रगोंडा पाटील हा फरार आहे. पानसरे हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्याशी त्याचा संपर्क झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दाभोलकर व कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणात रूद्रगोंडा पाटील याचा सहभाग असल्याचे तपासात पुढे येत आहे. त्या अनुषंगाने समीरकडून रूद्रगोंडा पाटीलची माहिती घेतल्याचे समजते. समीरने दिलेल्या माहितीबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sameer's second CBI inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.