जनसुराज्यचे समित कदम भाजप नेत्यांचे प्रिय कसे..?, अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:13 PM2024-07-30T16:13:42+5:302024-07-30T16:14:32+5:30

राज्य सरकारने दिलेली वाय दर्जाची सुरक्षा हाही वादाचा विषय

Samit Kadam of Jansuraj how dear to BJP leaders, discussion after Anil Deshmukh accusation | जनसुराज्यचे समित कदम भाजप नेत्यांचे प्रिय कसे..?, अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर चर्चा

जनसुराज्यचे समित कदम भाजप नेत्यांचे प्रिय कसे..?, अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर चर्चा

कोल्हापूर : ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव घेऊन जनसुराज्यशक्ती युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम हे माझ्याकडे आले होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकताच केला. यावर कदम यांनीही पलटवार केल्याने या दोघांमधील कलगीतुरा राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे.

सध्या जनसुराज्यशक्ती पक्षाच्या युवा आघाडीचे कदम हे राज्याचे अध्यक्ष असले तरी ते भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या किचन कॅबिनेटमधील सदस्य मानले जातात. त्यामुळे इतर पक्षातील महत्त्वाच्या पदावर असलेले कदम भाजप नेत्यांना इतके का प्रिय आहेत यावरून सोशल मीडियावर घमासान सुरू आहे.

कदम हे २०१६ पासून जनसुराज्यशक्ती पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचे वडील मिरज नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. घरातूनच राजकीय वारसा असलेल्या कदम यांचे मिरज हे हाेमग्राउंड असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा सर्वाधिक वावर आहे. हे दोन्ही जिल्हे वगळले तर कदम यांची ओळख फारशी नाही. मात्र, ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी फडणवीस यांचा प्रस्ताव घेऊन कदम हे माझ्याकडे आले होते, असा दावा माजी मंत्री देशमुख यांनी केल्यानंतर कोण हे कदम.. ? ते कुठले, त्यांचा अन् फडणवीस यांचा संबंध आलाच कसा..? उपमुख्यमंत्र्यांच्या ते इतके जवळसे कसे..? असे एक ना अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. कदम यांचे विविध राजकीय नेत्यांसोबतचे जुने फोटो पुन्हा पुढे आणले जात आहेत. त्यांना राज्य सरकारने दिलेली वाय दर्जाची सुरक्षा हाही वादाचा विषय बनला आहे.

भाषाशैली, वक्तृत्वाची भुरळ

राजकीय वारसा असलेले कदम यांचे इंग्रजीवर चांगले प्रभुत्व आहे. एखादी गोष्ट ती सहजरित्या पटवून देऊ शकतात. शिवाय, राज्यभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरची त्यांची ऊठबस अनेकांना कोड्यात टाकणारी आहे. कदम यांना राज्य सरकारने वाय दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. ज्या पक्षाचा राज्यात एकच आमदार आहे त्या पक्षाच्या युवा आघाडीच्या अध्यक्षाला इतकी अतिमहत्त्वाची सुरक्षा कशी असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजप नेत्यांशी घरोबा

समित कदम हे राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या किती जवळ आहेत हे सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोवरून लक्षात येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या किचनकॅबिनेटमधील ते एक महत्त्वाचे सदस्य मानले जातात. कदम यांच्या घरगुती कार्यक्रमालाही राज्यातील अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली आहे.  आमदार विनय कोरे यांची मुंबईतील कामे करण्यात, भेटीगाठी घडवून आणण्यात ते पुढे असतात. कोरे व पंतप्रधान यांच्या भेटीवेळीही तेच प्रमुख असल्याप्रमाणे पुढे होते.

Web Title: Samit Kadam of Jansuraj how dear to BJP leaders, discussion after Anil Deshmukh accusation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.