कोल्हापूर जिल्ह्यातील सभापती निवडीत समझोता एक्स्प्रेस
By admin | Published: September 15, 2014 12:54 AM2014-09-15T00:54:42+5:302014-09-15T00:57:26+5:30
हातकणंगले, पन्हाळा निवडी चिठ्ठीवर : काँग्रेसचे ६, राष्ट्रवादीचे ४ सभापती, शिरोळमध्ये स्वाभिमानी
कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडीत काँग्रेसने बारा पैकी सहा पंचायत समित्या आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, तर स्वाभिमानीने शिरोळची सत्ता कायम ठेवली, तर ‘जनसुराज्य’ला पन्हाळ्याची सत्ता चिठ्ठीवर मिळाली.
चंदगडमध्ये माजी आमदार नरसिंगराव पाटील गटाला सभापती, तर माजी मंत्री भरमूअण्णा पाटील गटाला उपसभापती पद मिळाले. राधानगरी-भुदरगड या दोन तालुक्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी कायम राहिली. या दोन्हीही तालुक्यांत राष्ट्रवादीकडे सभापतिपद, तर उपसभापतिपद काँग्रेसकडे राखून समझोता एक्स्प्रेस धावली. कागलमध्ये संजय घाटगे गटाने सभापतिपदासाठी बाजी मारली, तर मंडलिक गटाचे भूषण पाटील यांची उपसभापती म्हणून फेरनिवड केली. गडहिंग्लजमध्येही राष्ट्रवादीने बाजी मारली. करवीर, गगनबावडामध्ये कॉँग्रेसने सभापती पद राखले. हातकणंगले आणि पन्हाळा सभापतिपदासाठी रस्सीखेच झाली. दोन्हीही ठिकाणी समान बलाबल झाले. हातकणंगलेत कॉँग्रेसने सत्ता मिळविली, तर पन्हाळ्यावर जनसुराज्यने सत्ता हस्तगत केली. शाहूवाडीमध्ये संख्याबळ असतानाही सत्यजित पाटील गटाला सभापतिपदावर हक्क मिळवता आला नाही. तेथे सत्ता नसतानाही कॉँग्रेसने बाजी मारली. आजऱ्यातही दोन्ही कॉँग्रेसची समझोता एक्स्प्रेस धावली. येथे काँग्रेसला उपसभापतिपद देऊन मुश्रीफ गटाने राष्ट्रवादीची सत्ता आणली.
(सविस्तर वृत्त/ हॅलो पान १)