संपत, सचिन पाटील यांच्या उसाचे पवार यांनाही अप्रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:44 AM2018-12-03T00:44:31+5:302018-12-03T00:44:35+5:30
आंबोली : बुवाचे वाठार (ता. हातकणंगले) येथील संपत पाटील व सचिन पाटील यांनी घेतलेल्या एकरी १४० टन ऊस उत्पादनाचे ...
आंबोली : बुवाचे वाठार (ता. हातकणंगले) येथील संपत पाटील व सचिन पाटील यांनी घेतलेल्या एकरी १४० टन ऊस उत्पादनाचे शास्त्र समजून घेण्यासाठी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांचे पथक त्यांची भेट घेणार आहे. येथे रविवारी झालेल्या ‘व्हीएसआय’च्या नियामक मंडळाच्या सभेत स्वत: शरद पवार यांनीच तशा सूचना केल्या. पवार यांनाही या उत्पादनाबद्दल अप्रूप वाटले.
गेल्या आठवड्यात पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शरद साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळी संपत पाटील व त्यांचे पुतणे सचिन पाटील यांची पवार यांच्याशी भेट झाली होती. या चुलत्या-पुतण्यांनी पिकविलेला ऊस सरासरी १९ ते २१ फूट उंचीचा असून, त्याला ४२ कांड्या होत्या. त्याबद्दल पवार यांनीही त्यांच्याकडून उत्सुकतेने माहिती जाणून घेतली होती; परंतु एखादा शेतकरी इतके चांगले उत्पादन कसे काढू शकतो, याची शास्त्रीय माहिती अन्य शेतकºयांनाही व्हावी यासाठी ‘व्हीएसआय’च्या पथकाने जाऊन त्याची माहिती घ्यावी व त्याची नोट तयार करून नियामक मंडळाच्या सदस्यांना द्यावी, अशी सूचना पवार यांनी केली.
गडहिंग्लजपर्यंत नव्या जमिनीचा शोध
‘व्हीएसआय’च्या आंबोलीतील संशोधन केंद्रास आता जागा कमी पडत आहे. त्यामुळे या केंद्रापासून गडहिंग्लजपर्यंत किमान ५० ते ६० एकर क्षेत्र एकत्रित कुठे उपलब्ध होईल का, याची चौकशी करावी, अशीही सूचना पवार यांनी केली.