‘देवस्थान’च्या १७ कर्मचाऱ्यांच्या हस्ताक्षरांचे घेतले नमुने

By admin | Published: July 30, 2016 12:30 AM2016-07-30T00:30:18+5:302016-07-30T00:30:18+5:30

जमीन गैरव्यवहार प्रकरण : सावंतवाडीच्या तिघा कर्मचाऱ्यांकडे कसून चौकशी; मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा दावा

Samples of 17 signatures of 'Devasthan' | ‘देवस्थान’च्या १७ कर्मचाऱ्यांच्या हस्ताक्षरांचे घेतले नमुने

‘देवस्थान’च्या १७ कर्मचाऱ्यांच्या हस्ताक्षरांचे घेतले नमुने

Next

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या उदगिरी येथील शेतजमीन गैरव्यवहारप्रकरणी शिवाजी पेठेतील समितीच्या कार्यालयातील २३ पैकी १७ कर्मचाऱ्यांचे हस्ताक्षर नमुने पोलिसांनी घेतले आहेत. समितीच्या सावंतवाडी येथील कार्यालयातील तिघा लिपिकांकडे शुक्रवारी कसून चौकशी करण्यात आली. शीतल इंगवले, अनिरुद्ध गुरव व दीपक म्हेत्तर अशी त्यांची नावे आहेत. आज, शनिवारीही त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. त्यांच्याही हस्ताक्षराचे नमुने पोलिसांनी घेतले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची शाहूवाडीत साडेचार हजार एकर शेतजमीन आहे. ‘सीआयडी’च्या भूखंड गैरव्यवहार चौकशीमध्ये शाहूवाडीतील उदगिरी येथील एक हजार एकर शेतजमीन देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांच्या समितीच्या लेटरपॅडवर बोगस सह्या व शिक्के मारून मुंबईतील देव रिर्सोसेस इंडिया व एन. एस. कुंभार ट्रेडर्स अँड मिनरल्स (पेठवडगाव) या दोन कंपन्यांच्या नावे चढविण्याचा प्रयत्न झाला. या गैरव्यवहार प्रकरणाला ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. या समितीवर पदे भूषविलेल्या काही सदस्यांचे धाबे दणाणले आहे. या भूखंड गैरव्यवहारात मोठे रॅकेट असल्याचा दावा खुद्द पोलिसांनीच केला आहे. देवस्थानचे कर्मचारी शिवाजी साताप्पा साळवी (रा. मोहिते कॉलनी, कळंबा) यांनी दोन कंपन्यांसह अनोळखी व्यक्तींच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या प्रकरणी समितीच्या कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश सचिव शुभांगी साठे यांना दिले. हा प्रकार समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात झाल्याने समितीचे सदस्य व कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. देवस्थानमध्ये सचिवांसह लिपिक, शिपाई, चालक व इंजिनिअर असे २३ कर्मचारी आहेत. त्यापैकी १७ जणांचे हस्ताक्षरांचे नमुने व जबाब पोलिसांनी घेतले आहेत. हा गैरव्यवहार सन २०१२ ते २०१५ या कालावधीत झाला आहे. याठिकाणी काम करणारे लिपिक शीतल इंगवले, अनिरुद्ध गुरव, दीपक म्हेत्तर यांची सावंतवाडी कार्यालयाकडे बदली आहे. त्यामुळे त्यांना शुक्रवारी व शनिवार असे दोन दिवस चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने व जबाबही पोलिसांनी घेतले. देवस्थान समिती प्रशासनानेही त्यांच्याकडे चौकशी करून लेखी जबाब घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)


समितीच्या सचिव शुभांगी साठे यांनी कोणताही आदेश किंवा पत्र दिले नसताना दि. १८ आॅगस्ट २०१५ मध्ये जावक रजिस्टरमधील पान नं. २३ वर देव वशि/११२ व देव वशि १५९९/२०१५ नोंदी केल्या आहेत. हा प्रस्ताव खरा असल्याचे भासवून शाहूवाडी तहसीलदारांना सादर केला आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार व रजिस्टरमध्ये ठराव घुसडण्याचा प्रयत्न समिती सदस्यांसह काही कर्मचाऱ्यांपैकी कोणीतरी केला आहे. हे धाडस करणारे चार-पाच सदस्य पोलिसांच्या रडारवर आहेत. ते कोण, हे आता चौकशीनंतर पुढे येणार आहे. या आवक-जावक रजिस्टरमध्ये नोंद करण्याची जबाबदारी लिपिक मोहिनी मोहिते यांच्याकडे आहे. देवस्थान प्रशासनाने त्यांना लेखी नोटीस पाठवून यासंबंधी खुलासा देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावर त्यांनी कार्यालयात ज्याठिकाणी आवक-जावक रजिस्टर ठेवण्याची कपाटे आहेत. त्यांना कुलपे नाहीत. कार्यालयाची वेळ संपल्यानंतर कपाटांना कुलपे नसल्याने कोणीतरी त्यामध्ये फेरफार केल्याचे म्हटले आहे. या प्रकाराबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर कार्यालयातील सर्व कपाटांना आता कुलूपे लावण्यात आली आहेत.

Web Title: Samples of 17 signatures of 'Devasthan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.