कोराणे, तेलनाडे अटकेपासून दूरच, चार वर्षांपासून शोध सुरूच; पोलिसांचे अपयश की राजकीय वरदहस्त?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 05:14 PM2023-01-30T17:14:58+5:302023-01-30T17:19:15+5:30

गुन्ह्यातील मुख्य संशयितच पोलिसांना का सापडत नाहीत?

Samrat Korane, Telnade still far from arrest, The search continued for four years | कोराणे, तेलनाडे अटकेपासून दूरच, चार वर्षांपासून शोध सुरूच; पोलिसांचे अपयश की राजकीय वरदहस्त?

कोराणे, तेलनाडे अटकेपासून दूरच, चार वर्षांपासून शोध सुरूच; पोलिसांचे अपयश की राजकीय वरदहस्त?

googlenewsNext

कोल्हापूर : मटका अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी अवैध व्यावसायिकांवर धडक कारवाईची मोहीम सुरू करून चार वर्षे उलटली. जिल्ह्यातील ४४ संशयितांवर मोक्कांतर्गत आरोपपत्रही दाखल झाले. मात्र, अजूनही अवैध धंद्यांचे मुख्य सूत्रधार सम्राट कोराणे, पप्पू सावला आणि सुनील तेलनाडे पोलिसांच्या अटकेपासून दूरच आहेत. त्यामुळे मुख्य संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश येत आहे, की राजकीय दबावापोटी पोलिस संशयितांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

यादवनगर येथे सलीम मुल्ला याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकावर हल्ला झाला होता. अवैध व्यावसायिकांनी थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवरच पिस्तूल रोखल्याने खळबळ उडाली होती. त्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी अवैैध व्यावसायिकांवर धडक कारवाईची मोहीम उघडली होती.

त्यानुसार मटका बुकी सलीम मुल्ला, माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह मुंबईत बसून मटक्याची सूत्रे हलवणारे मनीष अग्रवाल, राकेश अग्रवाल यांच्यावरही अटकेची कारवाई झाली. याच गुन्ह्यात पोलिसांनी कोल्हापुरातील सम्राट कोराणे आणि मटका रॅकेट चालवणारा मुंबईतील प्रकाश उर्फ पप्पू सावला याच्यावरही गुन्हा दाखल केला होता. मात्र, चार वर्षे होत आली तरी अजूनही या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. शहर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

यादवनगरातील गुन्ह्यात ४४ पैकी ४२ जणांना अटक झाली. त्यांच्यावर तातडीने मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी संशयितांवर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. सध्या या गुन्ह्यातील सम्राट कोराणे आणि पप्पू सावला वगळता अन्य सर्व आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि नेपाळमध्ये शोध घेऊनही हे दोघे पोलिसांना सापडलेले नाहीत, त्यामुळे हे पोलिसांचे अपयश आहे, की संशयितांकडून वापरल्या जाणाऱ्या राजकीय दबावाची कमाल आहे, याबाबत चर्चा सुरू आहे.

चकवा की डोळेझाक?

सम्राट कोराणे याला फरार घोषित केले असले तरी अधूनमधून तो कोल्हापुरात येऊन जात असल्याची चर्चा पेठेत सुरू असते. इचलकरंजीतील एका नेत्याच्या वरदहस्तामुळेच पोलिस त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

तेलनाडेही पोलिसांना सापडेना

इचलकरंजीतील तेलनाडे बंधूंवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मात्र त्यापैकी संजय तेलनाडे सध्या जामिनावर बाहेर आहे, तर सुनील तेलनाडे जवळपास चार वर्षांपासून फरार आहे. त्यामुळे गुन्ह्यातील मुख्य संशयितच पोलिसांना का सापडत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होतो.

दोघांना तात्पुरता जामीन

अटकेतील शरद कोराणे आणि मनीष अग्रवाल या दोघांनी वैद्यकीय उपचारासाठी तात्पुरता जामीन मिळावा, अशी विनंती न्यायालयात केली होती. त्यानुसार कोराणे याला सहा महिन्यांचा, तर अग्रवाल याला तीन महिन्यांचा तात्पुरता जामीन गेल्या महिन्यात मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अवैध व्यावसायिकांवर मोक्कांतर्गत केलेल्या कारवाईमुळे अवैध व्यवसायांचे प्रमाण कमी झाले आहे. फरार असलेले कोराणे आणि सावला या दोघांचा शोध सुरू असून, त्यांच्या अटकेसाठी राज्यातील पोलिसांसह इतर यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे. - मंगेश चव्हाण - शहर पोलिस उपअधीक्षक
 

Web Title: Samrat Korane, Telnade still far from arrest, The search continued for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.