Kolhapur: समृद्धी मार्गामुळे वाघबीळ घाटाच्या सौदर्यांला बाधा, दरीतील झाडे तोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 06:02 PM2024-08-29T18:02:18+5:302024-08-29T18:02:18+5:30
भूस्खलनाचा धोका वाढला
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : नागमोडी वळणे, घनदाट झाडी, थंड हवेची अनुभूती देणारा रस्ता, सेल्फी पॅाइंट अन् निसर्गरम्य वातावरणाने मन प्रसन्न करणाऱ्या वाघबीळ घाटाच्या सौंदर्याला समृद्धी मार्गाच्या विस्तारीकरणामुळे बाधा निर्माण झाली आहे. तीन किलोमीटर अंतराच्या प्रवासातील घाट माथ्याच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद आता प्रवासादरम्यान प्रवाशांना अनुभवयास मिळणार नाही. नागमोडी वळणे काढून रस्ता सरळ होत आहे. दरीतील झाडे तोडून तेथे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. रस्ते विकासामुळे घाटाच्या निसर्ग सौंदर्यांचे विद्रुपीकरण होत असल्याने निसर्गप्रेमींतून चिंता व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा, पन्हाळा आणि रत्नागिरी या प्रेक्षणीय पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी वाघबीळ घाटातूनच जावे लागते. वेडीवाकड्या वळणांमुळे वाघबीळ घाटाचा प्रवास धोकादायक वाटत असला घाटातील आल्हादायक वातावरणामुळे घाटातील प्रवास आनंददायी वाटत असल्याचे प्रवाशांत चर्चा आहे. रस्ते विकासामुळे तो अनुभव आता अनुभवायला मिळणार नाही.
नलवडे बंगल्यापासून घाटाला सुरुवात होते. अगदी वाघबीळ फाट्यापर्यंतच्या तीन किलोमीटर अंतरापर्यंत अकरा नागमोडी वळणे येतात. घाटातील वळणे काढण्यासाठी डोंगर फोडल्याने घाटाच्या डोंगराचे विद्रुपीकरण झाले आहे. वळणाच्या ठिकाणी असणाऱ्या खोलगट दरीवर भराव टाकून त्यावर सपाटीकरणाचे काम सुरू आहे. हिरव्यागार झाडीसोबत सेल्फी काढताना तरुणाईचे पाय आपोआप घाटाच्या वळणावरील कठड्याकडे वळायाचे. विस्तारीकरणामुळे तो पॅाइंट आता शोधावा लागतो. एकंदरीत समृद्धी मार्गामुळे वाघबीळ घाटाच्या सौंदर्याला बाधा पोहोचल्याने घाटामाथ्याचा आनंद आता प्रवासादरम्यान लुटता येत नाही.
वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका
जैवविविधतेने नटलेल्या वाघबीळ घाटात घनदाट झाडींमुळे वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याचे अनेक वेळा आढळून आले. राक्षी, धबधबेवाडीच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी वाधबीळ घाटाचा रस्ता ओलांडून पडळवाडीच्या पाझर तलावाकडे येतात. यापुढे मोठा मार्ग ओलांडताना त्यांना त्रास होणार आहे. झाडी तोडून आणि डोंगर फोडून घाटमाथ्याचे अस्तित्व संपविल्याने वाघबीळ घाट परिसर ओसाड दिसत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.
भूस्खलनाचा धोका वाढला
दळणवळणाच्या दृष्टीने कित्येक वर्षांपूर्वी बनविलेल्या वाघबीळ घाटात कधीच दरड कोसळली नाही की, वाहतूक यंत्रणा कोलमडली नाही, हा इतिहास आहे. समृद्धी मार्गासाठी डोंगर फोडायला सुरुवात केल्यापासून वाघबीळ फाट्याजवळील दुसऱ्या वळणाजवळ भूस्खलन झाले होते. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डोंगर खोदल्याने दगडाच्या निखळलेल्या कडा ढासळून भूस्खलन होण्याची भीती आहे.