थकबाकीदारांच्या दारात ‘सनई-चौघडा’
By admin | Published: January 8, 2016 12:27 AM2016-01-08T00:27:33+5:302016-01-08T00:27:33+5:30
जिल्हा बँकेचे वसुली अभियान : सोमवारी ‘गांधीगिरी’ पद्धतीचा अवलंब
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चार बडे थकबाकीदार असलेल्या तंबाखू संघाचे संजय पाटील, उदयसिंहराव गायकवाड साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, इंदिरा महिला साखर कारखान्याच्या अध्यक्षा विजयामाला देसाई व कोल्हापूर बिजोत्पादक संघाचे अध्यक्ष वसंतराव पाटील-कौलवकर यांच्या दारात सोमवारी ‘सनई-चौघडा’ लावून गांधीगिरी पद्धतीने कर्जवसुली आंदोलन करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या कर्जदारांना शनिवारपर्यंत (ता. ९) कर्ज भरण्याची मुदत दिली आहे, तोपर्यंत त्यांनी ही रक्कम न भरल्यास पहिल्यांदा सोमवारी
(दि. ११) बँकेचे कर्मचारी या चौघांच्या दारात जाऊन सनई चौैघडा वाजवत बसतील. त्यानंतर सर्व संचालक मंडळही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. बँकेने कर्ज वसुलीसाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. त्याचा भाग म्हणून एक कोटीहून जास्त कर्ज थकीत असलेल्या
५० बड्या थकबाकीदारांची यादी आम्ही काढली आहे. त्यातील सर्वांत चार बडे थकबाकीदार जे आहेत त्यांच्याकडेच बँकेचे १०१ कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या दारांत पहिल्यांदा जाऊन बसायचे, असे आम्ही ठरविले आहे. हे कर्ज संस्थेसाठी घेतले असले तरी ते घेताना संस्थाचालक म्हणून जे लोक पुढे होते, त्यांच्या घराच्या दारात जाऊन कर्मचारी, अधिकारी आंदोलन करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
कर्जाची थकबाकी अशी..
विजयमाला देसाई ऊस तोडणी संस्था :
९ कोटी ४० लाख
अ) उदयसिंगराव गायकवाड ऊस तोडणी वाहतूक संस्था : २७ कोटी ५१ लाख
ब) उदयसिंगराव गायकवाड कारखाना तात्पुरते कर्ज ०१ : ११ कोटी १७ लाख
क) उदयसिंगराव गायकवाड कारखाना तात्पुरते कर्ज ०२ : २ कोटी ९९ लाख
ड) उदयसिंगराव गायकवाड कारखाना तात्पुरते कर्ज ०३ : ४ कोटी४६ लाख
४अ) कोल्हापूर जिल्हा बिजोत्पादक संघ :
१ कोटी २७ लाख
ब) भोगावती कुक्कुटपालन संस्था, परिते :
५ कोटी ३० लाख
शेतकरी सहकारी तंबाखू संघ उद्योग समूह
१) तंबाखू खरेदी-विक्री संघ : २४ कोटी
२) शेतीमाल प्रक्रिया संघ : ५ कोटी ४९ लाख
३) महाराष्ट्र स्टेट टोबॅको फेडरेशन :
३ कोटी ७१ लाख
४) मयूर वाहतूक संस्था : २ कोटी २० लाख
५) एस. के. पाटील बँक, कुरुंदवाड :
२ कोटी ७८ लाख
६) तंबाखू संघ समूह नोकर सोसायटी :
५६ कोटी ९७ लाख
एकूण थकबाकी : १०० कोटी ९३ लाख