कोल्हापुरात सनई, चौघड्यांच्या साथीने व्यवसाय सुरु, राजारामपुरीत रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 07:05 PM2021-07-19T19:05:51+5:302021-07-19T19:07:43+5:30
CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर शहरातील सर्वप्रकारची व्यावसायिक दुकाने सोमवारी सुरु झाली.
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर शहरातील सर्वप्रकारची व्यावसायिक दुकाने सोमवारी सुरु झाली.
प्रशासनाने निर्बंध उठवल्यामुळे राजारामपुरीत व्यापारी, दुकानदारांनी बैलगाडीतून सनई, चौघड्यांसह रॅली काढून व्यवसाय सुरु झाल्याचा आनंद व्यक्त केला. सर्व व्यवसाय सुरु झाल्याने अनेक दिवसांपासून रिकामे वाटणारे रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली.
कोल्हापूर जिल्ह्यात पहिली लाट ओसरल्यानंतर साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये कोल्हापुरातील सर्व व्यवसाय सुरु झाले. परंतु, व्यावसायिक, व्यापारी यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एप्रिलपासून कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याने पुन्हा व्यवसाय बंद ठेवावे लागले. शासनाचे निर्बंध, जनता कर्फ्यू, संपूर्ण लॉकडाऊन अशा विविध कारणांनी गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील अनेक दुकाने बंद होती. ती सुरु करावीत, असा व्यापाऱ्यांचा तगादा सुरु होता.
यासाठी निवेदने, गाठीभेटीद्वारे राज्य शासनाला विनंती करण्यात आली होती. परंतु, जोपर्यंत तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्हा येत नाही, तोपर्यंत प्रशासनाने व्यवसायाला परवानगी नाकारली होती.
अखेर सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने शहरातील निर्बंध आणखी शिथील केले आणि अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह सरसकट सर्वच दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली. त्यामुळे व्यापारी, दुकानदारांमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण होते.
व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी कालपासूनच तयारी सुरु केली होती. दुकानांच्या साफसफाईसह पूजेची तयारी केली होती. सोमवारी सकाळी व्यापारी, दुकानदारांनी पुन्हा असा प्रसंग येऊ नये, अशी भावना व्यक्त करत दुकानात पाऊल टाकले.
राजारामपुरीत व्यापाऱ्यांची रॅली
प्रशासनाने निर्बंध शिथील केल्यामुळे राजारामपुरीत सकाळी व्यापाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ राजारामपुरी जनता बझार येथून रॅली काढण्यात आली. ही रॅली मुख्य मार्गावरुन मारुती मंदिर व परत बस रुटने गेली. रॅलीमध्ये सनई, चौघडा होता. व्यापाऱ्यांच्या हातात जनजागृती करणारे फलक होते.
राजारामपुरीत खरेदीसाठी येणाऱ्या ज्या ग्राहकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांच्यासाठी खास डिस्काऊंट देण्याचा निर्णय राजारामपुरीतील व्यापाऱ्यांनी घेतला असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली. आमचा हा प्रयत्न व्यवसाय वाढीसाठी नाही तर लसीकरणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.