कोल्हापुरात ‘सनातन’ साधकांची झाडाझडती

By admin | Published: June 16, 2016 12:48 AM2016-06-16T00:48:47+5:302016-06-16T01:02:39+5:30

वीरेंद्रसिंग तावडेकडूनच देसाई यांना धमकीची शक्यता

'Sanatan' seekers' plantation in Kolhapur | कोल्हापुरात ‘सनातन’ साधकांची झाडाझडती

कोल्हापुरात ‘सनातन’ साधकांची झाडाझडती

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या व डॉ. देसाई धमकीप्रकरणी ‘सीबीआय’ व ‘एसआयटी’ला डॉ. वीरेंद्रसिंग तावडेकडून महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याने कोल्हापूर पोलिसांनी डॉ. तावडेच्या संपर्कात असलेल्या कोल्हापुरातील काही ‘सनातन’ साधकांची झाडाझडती सुरू केली आहे.
येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना आलेल्या निनावी धमकी पत्रासंबंधी डॉ. तावडे याच्याकडे ‘सीबीआय’ व ‘एसआयटी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. यावेळी डॉ. तावडेकडे मिळालेल्या हार्डडिस्कमध्ये पुरोगामी विचारांच्या व्यक्तींच्या यादीमध्ये डॉ. देसाई यांच्या नावाचाही उल्लेख असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
पानसरे हत्येचा मास्टर मार्इंड डॉ. तावडेच असल्याचे ‘सीबीआय’च्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी डॉ. तावडेचा ताबा मिळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. ‘सीबीआय’ने तावडेच्या घरावर छापे टाकल्यानंतर डॉ. देसाई यांनी दि. १८ एप्रिल व ३ जूनला पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन दिलेल्या अर्जामध्ये डॉ. तावडेची चौकशी करण्याची मागणी केली होती. तक्रार अर्जामध्ये सहा वर्षांपूर्वी डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा अभय वर्तक यांच्यासह गोवा व फोंड्याच्या काही व्यक्तींसोबत कार्यालयात आला. त्याने तुम्ही धर्म आणि तत्त्वज्ञानातील डॉक्टरेट आहात. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे सचिव असल्याने आमच्यासाठी तुम्ही एक महत्त्वाची व्यक्ती आहात. त्यांनी आपणास ‘सनातन प्रभात’ दैनिकाचे संपादक होण्याची विनंती केली; परंतु काही दिवसांनी मी त्यांना नकार कळविला. त्याची नाराजी त्यांच्या मनात असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेही तपास व्हावा, असा उल्लेख केला होता. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीबीआय एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तिन्ही तपास यंत्रणांद्वारे सुरू आहे. ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी डॉ. तावडेच्या घरी व आश्रमावर छापा टाकला असता त्याकडे मिळून आलेल्या हार्डडिस्कमध्ये अनेक पुरोगामी विचारांच्या व्यक्तींची यादी मिळाली. यासंबंधी ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी ‘सीबीआय’ने तावडेकडे चौकशी केली आहे. कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात डॉ. तावडे आल्यानंतर आणखी काही महत्त्वाचे पुरावे हाती लागणार असल्याचे सांगितले.
तावडेचा डॉ. दाभोलकरांशी वाद
कोल्हापुरात सहा वर्षांपूर्वी दसरा चौकातील शाहू स्मारक येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होता. डॉ. दाभोलकर यांनी व्याख्यान संपल्यानंतर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, असे बोलताच समोर प्रेक्षक गॅलरीत बसलेला डॉ. वीरेंद्रसिंग तावडे उठून तुम्ही जे काही सांगत आहात ते चुकीचे आहे, असा आरोप करत डॉ. दाभोलकरांशी वाद घातला. ही आठवण ‘अंनिस’चे कार्यकर्ते सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकारांना सांगितली.
न्यायालयीन कोठडी मिळताच ताबा
पुणे न्यायालयाने डॉ. तावडेचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांना मंजुरी दिली आहे. ‘सीबीआय’ने तावडेला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळताच कोल्हापूर पोलिस त्याचा ताबा घेणार आहेत. त्यासाठी बुधवारी दुपारीच विशेष पथक पुण्याला रवाना झाले.


डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याच्याकडे मिळून आलेल्या हार्डडिस्कमध्ये पुरोगामी विचारांच्या व्यक्तींची नावे मिळून आली आहेत. पोलिसांनी संबंधित व्यक्तींना सर्तक करून त्यांच्या सुरक्षेची योग्य ती दक्षता घ्यावी.
डॉ. सुभाष देसाई,
ज्येष्ठ पत्रकार

Web Title: 'Sanatan' seekers' plantation in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.