‘सनातन’च्या कार्यकर्त्यास पानसरे हत्येप्रकरणी अटक
By admin | Published: September 17, 2015 01:34 AM2015-09-17T01:34:51+5:302015-09-17T01:34:51+5:30
तरुणास मंगळवारी रात्री सांगलीत अटक
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाचा संशयित म्हणून सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असलेल्या एका तरुणास मंगळवारी रात्री सांगलीत अटक करण्यात आली. समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. दक्षिण शिवाजीनगर, मोती चौक, शनिमारुती मंदिराजवळ, शंभर फुटी रोड, सांगली) असे त्याचे नाव आहे, अशी माहिती विशेष तपास पथकाचे प्रमुख व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
गायकवाड हाच मारेकरी असल्याचा आजच्या घडीला आमचा दावा नाही; परंतु तो या प्रकरणातील महत्त्वाचा संशयित (क्लोज सस्पेक्ट) असल्याचेही संजयकुमार यांनी स्पष्ट केले. त्या आधारे आम्ही या प्रकरणाचा छडा लावू, असे त्यांनी सांगितले. गायकवाड याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट क्रमांक ६) आर. डी. डांगे यांच्यासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात त्याला सुमो गाडीत घालून पोलिसांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात नेले.
संजयकुमार स्वत: मंगळवारी सकाळपासून कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. अटकेची माहिती त्यांनी पोलीस मुख्यालयात दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, तपास अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या उपस्थित होते.
संजयकुमार म्हणाले, ‘मागच्या वेळी (६ जूनला) मी जेव्हा पत्रकार परिषद घेतली, त्याच वेळी दोन-तीन महत्त्वाच्या दुव्यांवर आम्ही काम करीत असल्याचे सांगितले होते. हे काम सुरू असताना गायकवाड याच्याबाबत आम्हांला काही संशय आला होता; म्हणून गेले सहा महिने आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. त्याच्या मोबाईल संभाषणातून (टेक्निकल सर्व्हेलन्स) या हत्येचा उलगडा होईल, असे काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले.
आम्हांला त्याचा संशय आल्याने व पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी आम्ही मंगळवारी रात्री आठ वाजता त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे रात्रभर चौकशी केल्यानंतर आणखी काही महत्त्वाची माहिती पुढे आल्याने पहाटे साडेचार वाजता त्याला अटक करण्यात आली.’
गायकवाड हा मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. तो सांगलीत राहत असला तरी त्याची मुंबई व नवी मुंबई येथेही घरे आहेत. पोलिसांनी तेथील घरांची झडती सुरू केली आहे. पोलीस या हत्येशी संबंधित आणखी काही पुरावे व आणखी कोण या हत्येमध्ये सहभागी होते का, या दिशेने तपास करीत असल्याचे संजयकुमार यांनी सांगितले. पानसरे यांच्यावर गेल्या १६ फेब्रुवारीला सकाळी फिरायला गेल्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी मोटारसायकलवरून येऊन समोरून गोळ्या घातल्या होत्या. त्यामध्ये पानसरे व त्यांच्या पत्नी उमा ह्या गंभीर जखमी झाल्या. उपचार सुरू असताना पानसरे यांचे मुंबईत २० फेब्रुवारीस निधन झाले; परंतु त्यांचे मारेकरीच सापडत नसल्याने राज्य सरकारसह पोलीस खात्यावरही मोठा दबाव होता.
पानसरे यांच्यासारख्या अजातशत्रू नेत्याचा दिवसाढवळ्या खून केला जातो व पोलिसांना मारेकरी सापडत नाहीत याबद्दल समाजमनात प्रचंड संताप होता. या हत्येतील एक महत्त्वाचा संशयित पोलिसांच्या हाती लागल्याने किमान हा तपास पुढे सरकण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.