कोल्हापुरात राबविला जाणार ‘सनाथ गणेश’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:52+5:302021-09-06T04:28:52+5:30
कोल्हापूर : पुण्यातील सनाथ वेल्फेअर फाऊंडेशनतर्फे कोल्हापुरात ‘सनाथ गणेश ’ उपक्रम राबविण्यात येत आहे. शाडूच्या मूर्तींची विक्री केंद्र उभारून ...
कोल्हापूर : पुण्यातील सनाथ वेल्फेअर फाऊंडेशनतर्फे कोल्हापुरात ‘सनाथ गणेश ’ उपक्रम राबविण्यात येत आहे. शाडूच्या मूर्तींची विक्री केंद्र उभारून अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी निधी संकलन केले जाणार आहे. छत्रपती राजाराम टिंबर मार्केटच्या कमानीजवळ हे केंद्र कार्यरत आहे.
फाऊंडेशनच्या प्रमुख गायत्री पटवर्धन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम कोल्हापूरसह सांगली, मिरज, पुणे आदी ठिकाणी राबविला जात आहे. पर्यावरणपूरक सुंदर शाडू मातीतील सनाथ गणेश तसेच इतरही मूर्ती सनाथ विद्यार्थी सत्यजित पाठक व त्याच्या सहकाऱ्यांनी बनविल्या आहेत. कोल्हापुरातील विक्री केंद्र बालकल्याण संकुलातील माजी संस्थाश्रयी संतोष सुभाष रेवणकर हा चालवित आहे. सनाथ ही संस्था १८ वर्षांवरील बालगृहातील माजी अनाथ, निराश्रित प्रवेशितांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक प्रकारे साहाय्य करीत आहे. या उपक्रमातून मिळणारे पैसे बालगृहातील माजी अनाथ, निराश्रित प्रवेशितांच्या पुढील शिक्षणासाठीच वापरले जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त गणेशभक्तांनी या गणेशमूर्तीचे आगाऊ आरक्षण करून संस्थेच्या या उपक्रमास हातभार लावावा. असे आवाहन रेवणकर याने केले आहे.
सनाथ गणेशमूर्ती अशा,
सनाथ विद्यार्थी पाठक याने तयार केलेल्या गणेशमूर्तींमध्ये मेडियम जनता, एक लोड गणपती, दगडूशेठ हलवाई, लंबोदर, कानात नक्षी, अशा एक ना अनेक प्रकारच्या गणेशमूर्तींचा समावेश आहे.