किणी व उदगाव ग्रामीण रुग्णालयांना मंजुरी, आरोग्य विभागाचा आदेश : प्रत्येकी १४ कोटी रुपये मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:36+5:302021-04-07T04:26:36+5:30
कोल्हापूर : जयसिंगपूर-उदगाव (ता. शिरोळ) व किणी (ता. हातकणंगले) येथील प्रत्येकी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ...
कोल्हापूर : जयसिंगपूर-उदगाव (ता. शिरोळ) व किणी (ता. हातकणंगले) येथील प्रत्येकी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मंगळवारी मंजुरी दिली. त्यातील किणीची सुधारित प्रशासकीय मान्यता असून, उदगावला नवीन इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे.
उदगाव येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ जानेवारी २०१३ ला मंजुरी दिली आहे. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर आरोग्य सेवा आयुक्तालयाने अंदाजपत्रक करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार २०२०-२०२१ च्या दरसूचीनुसार आधारित त्याचे १४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक शिरोळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी तयार केले आहे. त्यास शासनाने मंजुरी दिली. आता त्यासाठी प्रत्यक्षात किती निधी उपलब्ध होतो, त्यानुसार काम कधी सुरू होते व हे ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्षात सुरू कधी होते. याबद्दल उत्सुकता राहील.
किणी (ता. हातकणंगले) येथील ग्रामीण रुग्णालयासही सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ जानेवारी २०१३ ला मंजुरी दिली आहे. या रुग्णालयाच्या मुख्य इमारत बांधकामाकरिता ४ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चाची त्याचवेळी प्रशासकीय मान्यता दिली होती; परंतु तीन वर्षांत जागाच उपलब्ध होऊ न शकल्याने काम होऊ शकले नाही. म्हणून २०१९-२० च्या दरसूचीवर आधारित १४ कोटी २१ लाख रुपयांचे नव्याने सुधारित अंदाजपत्रक हातकणंगले येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंत्यांनी तयार केले. त्यास शासनाने मंजुरी दिली.
राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्या मतदारसंघातील व मतदारसंघाशेजारील गावांतील ही दोन्ही रुग्णालये आहेत. त्यांनी पाठपुरावा करून त्यांची उभारणी व्हावी यासाठी लक्ष घातले तर ही रुग्णालये लोकांसाठी लवकर उपयोगात येऊ शकतील.