सुळकूड पाणी योजनेसंदर्भातील विविध विषयांवर नगरपालिका सभेत मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:31 AM2021-03-16T10:31:36+5:302021-03-16T10:33:00+5:30
Water ichlkaranji kolhapur-इचलकरंजी शहराला मंजूर झालेल्या दूधगंगा पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक ठिकाणी जागा खरेदी करणे. पाणी आरक्षण, योजनेसंदर्भात विविध परवानगी घेणे. तसेच नगरपालिकेच्या हिश्श्याची रक्कम भरणे, या विषयाला सोमवारी पालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
इचलकरंजी : शहराला मंजूर झालेल्या दूधगंगा पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक ठिकाणी जागा खरेदी करणे. पाणी आरक्षण, योजनेसंदर्भात विविध परवानगी घेणे. तसेच नगरपालिकेच्या हिश्श्याची रक्कम भरणे, या विषयाला सोमवारी पालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
या योजनेबाबतची सविस्तर माहिती माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी सभागृहात दिली. विषयपत्रिकेवरील ११ व ऐनवेळचे ५ अशा एकूण १६ विषयांवर चर्चा करून मंजुरी घेण्यासाठी श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या.
रिंग रोड येथील रस्ता रूंदीकरण करण्यात आला नाही. या मार्गावरून ऊस ट्रॅक्टर-ट्रॉली मोठ्या प्रमाणात जातात. तेथे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही गर्दी असते. त्यामुळे तत्काळ या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे, असे नगरसेविका संगीता आलासे यांनी सांगितले.
यावर याच ठिकाणी अनेक अपघात झाले असून, या रस्त्यासंदर्भात फक्त चर्चा केली जाते. मात्र, प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही, असा आरोप नगरसेवक मदन कारंडे यांनी उपस्थित केला. प्रकाश मोरबाळे यांनी शहरातील अनेक भू-संपादनाचे प्रश्न प्रलंबित असून त्यातील त्रुटी दूर करण्याची गरज व्यक्त केली.
नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये फर्निचरचे काम राहिले असून, वर्षाअखेर या सभागृहात कौन्सिल सभा घेण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अब्राहम आवळे यांनी सभागृहात केली. नगरपालिका मालकीच्या शहरातील विविध इमारतींमधील गाळेधारकांकडून दहा वर्षे घरफाळा वसूल केला नसल्याचे मोरबाळे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर प्रशासनाने थकीत घरफाळा वसुली करून नव्याने करार करण्याचे मान्य केले.
पाणीप्रश्नात वैयक्तिक नाराजी नको
नगरसेवक अजित जाधव यांनी सुळकूड योजनेसंदर्भात जवाहर साखर कारखान्यावर झालेल्या बैठकीचा वृत्तांत सभागृहात मांडण्याची मागणी केली. त्यावर सागर चाळके यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढाकार घेतला असून, वैयक्तिक नाराजी व्यक्त करू नये, अशी विनंती केली.
कार्यक्रमात नियोजन नाही
नगरपालिकेच्यावतीने नियमितपणे विविध कार्यक्रम घेतले जातात. मात्र, त्यामध्ये नियोजन नसते, अशी खंत सागर चाळके यांनी व्यक्त केली.