इचलकरंजीत आणखी सहा लसीकरण केंद्रांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:39+5:302021-07-19T04:17:39+5:30
इचलकरंजी : शहरात लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. मर्यादित केंद्रांवर लसीकरण सुरू असल्याने नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या ...
इचलकरंजी : शहरात लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. मर्यादित केंद्रांवर लसीकरण सुरू असल्याने नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या कोरोनावरील लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असून, नागरिकांना तातडीने लस मिळावी, तसेच गर्दी कमी होण्यासाठी नव्याने सहा केंद्रांना मंजुरी मिळाली असून, मंगळवार (दि.२०)पासून त्यास प्रारंभ होत आहे. १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आरोग्य सभापती संजय केंगार यांनी दिली.
शहरातील कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सध्या लसीची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्याने काही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी उपरोक्त सहा केंद्रांसह आणखी नवीन सहा केंद्रे मंजूर केल्याने केंद्रांची संख्या १२ झाली आहे. त्याचबरोबर शहरातील १२ खाजगी हॉस्पिटलमध्ये शासकीय दरानुसार लसीकरण सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन सहा लसीकरण केंद्रे
धारवट शाळा जवाहरनगर, सुभेदारकाका विद्यामंदिर क्र. ४८ वंदेमातरम व्यायामशाळेजवळ विक्रमनगर, कलागते मल्टिपर्पज हॉल राममंदिरासमोर, संत गाडगे महाराज विद्यामंदिर क्र. ५० शाहू पुतळा, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली रोड व अशोका हायस्कूल गणेशनगर या केंद्रांचा समावेश आहे.