औरवाड पाणवठ्यावर पुन्हा वाळू चोरी;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:36+5:302021-09-03T04:24:36+5:30
औरवाड पाणवठ्यावर पुन्हा वाळू चोरी * नृसिंहवाडी दत्त मंदिर घाटाला धोका रमेश सुतार : बुबनाळ औरवाड (ता. शिरोळ) येथील ...
औरवाड पाणवठ्यावर पुन्हा वाळू चोरी
* नृसिंहवाडी दत्त मंदिर घाटाला धोका
रमेश सुतार : बुबनाळ
औरवाड (ता. शिरोळ) येथील पाणवठ्यावर नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर पुन्हा बेकायदेशीर वाळू चोरी सुरू आहे. मध्यरात्री शेकडो वाळू तस्करांकडून लाखो रुपयांची वाळूची चोरी केली जात आहे. नदीचे पाणी उतरले असल्याने वाळू तस्करी जोरात आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी मंडल अधिकारी, तलाठी यांच्याकडे तक्रारी करूनदेखील याकडे सोयीस्कर का दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
औरवाड पाणवठ्यावरून नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री शेकडो वाळू तस्करांकडून चोरी सुरू आहे. मोटारसायकलवरून पोत्यातून मध्यरात्री बारा ते पहाटे सहा वाजेपर्यंत वाळू चोरी केली जाते. यामुळे नदीपात्रात खड्डे पडले असून, पात्र रूंद होऊन मंदिराच्या घाटाला धोका पोहोचत आहे. याबाबत औरवाड येथील शेतकरी, ग्रामस्थांनी मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तरीदेखील कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. मध्यंतरी तहसीलदार अर्पणा मोरे यांनी कारवाई करून वाळूचे डेपो जप्त केले होते. आता पुन्हा वाळू चोरी सुरू झाल्याने कारवाई होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
------------
चौकट - प्रशासन पंचनाम्यात व्यस्त
महसूल प्रशासन पंचनाम्यात व्यस्त झाले आहे. जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे झालेल्या दुकाने, घरे, शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यात तहसील कार्यालय व्यस्त असल्याचे पाहून वाळू तस्करांनी पुन्हा चोरी सुरू केली आहे. याला कायमचा पायबंद घालणे गरजेचे आहे.
फोटो - ०२०९२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - औरवाड (ता. शिरोळ) येथे पाणवठ्यावर कृष्णा नदीकाठालगत केलेली वाळू चोरी. (छाया - रमेश सुतार, बुबनाळ)