चंदनाचा टिळा - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:27 AM2021-09-27T04:27:16+5:302021-09-27T04:27:16+5:30

चारी दिशांना एकच काळा रंग व्यापून होता. शिवाराचा मातट रंग, पानांचा हिरवेपणा व आकाशाचा निळा रंग एकाच काळ्या रंगात ...

Sandalwood Tila - Part 1 | चंदनाचा टिळा - भाग १

चंदनाचा टिळा - भाग १

googlenewsNext

चारी दिशांना एकच काळा रंग व्यापून होता. शिवाराचा मातट रंग, पानांचा हिरवेपणा व आकाशाचा निळा रंग एकाच काळ्या रंगात बेमालूमपणे मिसळले होता. सुरेशची मन:स्थिती तशीच बनली होती. त्याच्या जीवनातले सारे रंग एकाच रंगात रंगले होते. असे नसते, तर तो अरुण व मनोजबरोबर कशाला आला असता इथे.

दिवसाची हालचाल निपचित पडली होती. फक्त रात्रीचे जीवन जागे होते. रात्रीची नि:शब्द शांतता त्यांचे आवाज कुरतडत होती. सुरेशलाही वाटत होते, त्याच्यातील सारा चांगुलपणा या अंधारात अस्पष्ट झाला आहे. त्याला निर्झराची झुळझुळ ऐकू आली व स्वत:मध्येही त्याला तसाच काहीसा आवाजाचा भास झाला. जलप्रवाहाच्या थंड आवाजात एक उमेद होती. त्याच उमेदीत चालत होता. आज रात्रीच्या संघर्षात त्याच्या रिकाम्या खिशात काही ना काही पडणार होते.

झरा ओलांडून जाताच तो अचानक थांबला. निर्झराची झुळझुळही अचानक थांबली. त्याचे शरीर मागे झुकले, तर डोके पुढे. त्याचे दोन्ही मित्र बरेच पुढे गेले होते. त्यांना जेव्हा जाणवले की, सुरेश खूप मागे राहिला आहे, तेव्हा तेही थांबले. काळ्याकुट्ट रात्रीची गडद शांतता तोडत मनोजने आवाज दिला, ‘‘सुरेश तू कुठे आहेस? थांबू नकोस.’’

‘‘तुला काय भीती वाटते काय?’’ अरुणही म्हणाला.

‘‘जर सुमन अजूनही जागी असेल तर....’ - सुरेश.

‘‘इतक्या रात्री जागून ती काय करत असेल?’’ - अरुण.

‘‘तूच तर म्हणालास की, मध्यरात्रीपर्यंत तिच्याकडे लोक येत-जात असतात.’’ - सुरेश.

तिघे परत चालायला लागले. मक्याच्या शेतामुळे तो दुसऱ्या वळणावर पोहोचला. तेथून मागील वस्तीचे दिवे दृष्टिआड झाले होते आणि समोर सुमनच्या घरातील दिव्यांचा उजेड दिसत होता. गावातले ते पहिले घर होते, जिथून उजेड बाहेर येत होता. बाकीची सारी घरे अंधारात बुडून गेली होती. उजेड पाहून तिघेही एकदम थांबले.

‘‘ती जागीच आहे’’ - सुरेश

‘‘यावेळी गावातल्या कोणत्या सज्जनाच्या मिठीत ती असेल?’’ - अरुण

‘‘मनोज! तूही तिच्याकडे गेला होतास ना?’’ - सुरेश

‘‘अरे, एकदाच नाही...’’ मनोज गर्वाने म्हणाला.

‘‘एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते ! अरुण म्हणाला.

‘कसले आश्चर्य?’’ - सुरेश.

‘‘सुमनचे दार ठोठावण्यासाठी भिणारा सुरेश आज एवढे साहस कसे करू शकला? - अरुण.

‘‘यालाच काळाचा महिमा म्हणतात.’’

चार-पाच पावले चालल्यावर त्यांना एक छोटी पाऊलवाट दिसली. त्या वाटेनेच त्यांना सुमनच्या शेतात प्रवेश करावयाचा होता. पूर्वेला दूरवर खुले मैदान पसरले होते. तेथून अंगावर काटा आणणारे वारे येत होते. सुरेशचा सदरा ठिकठिकाणी फाटलेला होता. बाहेरची थंडी त्या फाटक्यातून त्याच्या सर्वांगाला झोंबत होती. थंडीमुळे त्याची पावले नीट पडत नव्हती. तशात त्याच्या पायाखालून एक चिचुंद्री चॅकचॅक करीत पळाली. भीतीने सुरेशचे शरीर थरथरले. तो एकदम ओरडला. दबलेल्या आवाजात त्याला सावध करीत मनोज म्हणाला, ‘‘चूप ! ओरडू नकोस. सगळा खेळ बिघडवून टाकशील. रात्रीच्या शांततेने तुझा आवाज दूरपर्यंत पोहोचेल. जर ती खरोखर जागी असेल, आवाज ऐकेल तर मोठी पंचाईत होईल.’’

तिघेही त्या पाऊलवाटेवरून चालू लागले. सुमनचे घर एका बाजूला होते व दुसऱ्या बाजूला टोमॅटोचे शेत. सुरेशला एक गोष्ट समजत नव्हती की, सुमन गावातील सर्वात भ्रष्ट चारित्र्याची स्त्री असूनही तिचे शेत गावातील अन्य शेताहून हिरवेगार कसे? गावातील साऱ्यांनी तिच्याहून अधिक मेहनत केली होती, तरीही परमेश्वर सुमनवर एवढा कृपावंत का?

शेजारच्या एका शेतातलं बियाणं सुकून गेलं, तेव्हा आई म्हणाली होती की, दुरपदाची नयत चांगली नव्हती म्हणून तिचे शेत वांझ झाले. सुरेश मनातल्या मनात म्हणाला, ‘या सुमनने असे कोणते चांगले काम केले आहे, ज्यामुळे तिचे शेत असे भरास आले आहे, सोने ओकत आहे.’

‘खरोखर, टोमॅटोला सोन्यासारखा भाव आला आहे. आताच ६०/७० रुपये किलो आहे. पुढच्या आठवड्यात शंभरी गाठेल. रात्र अजूनही जागी होती. हेमंतातील थंडीने कुडकुडत होती. दात वाजत होते. सुरेशला तर हुडहुडी भरली होती. चाचपडत हळूहळू चालला होता. जेथे ते तिघे जाऊन पोहोचले, तेथे सुमनच्या घरातला प्रकाश लुकलुकत होता. तिघांनी त्या अंधुक प्रकाशात एकमेकाकडे पाहिले. टोमॅटोचे शेत त्यांच्या समोरच पसरलेले होते. त्याचा हिरवट ताजा गंध त्यांच्या अंत:करणाला आणखी आनंद देत होता. मनोज दबक्या आवाजात म्हणाला,‘‘घाई करूया. सुमनचे कान सशाचे आहेत. छोटीशी चाहूलही तिला चटकन कळते.’’

‘‘मग तर अतिशय सावध असले पाहिजे.’ - सुरेश.

Web Title: Sandalwood Tila - Part 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.