'उदं गं आई उदं'च्या गजरात सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापूरातील भाविक रवाना
By संदीप आडनाईक | Published: December 22, 2023 11:54 PM2023-12-22T23:54:58+5:302023-12-22T23:55:16+5:30
शनिवारी दिवसभरात आणखी सहा गाड्या डोंगराकडे रवाना होणार
संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: उदं गं आई उदं च्या गजरात शेकडो भाविक सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेसाठी एसटी बसने शुक्रवारी रवाना होण्यास सुरवात झाली. सकाळी पाच तर मध्यरात्री ११७ एसटी बसेसमधून हे भाविक डोंगराकडे रवाना झाले.उद्या, शनिवारी दिवसभरात आणखी सहा गाड्या डोंगराकडे रवाना होणार आहेत.
संभाजीनगर आगाराचे व्यवस्थापक शिवराज जाधव, आगार प्रमुख कुंदन भिसे तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या गाड्या मध्यरात्री डोंगराकडे मार्गस्थ झाल्या. कर्नाटकातील सौंदत्त्ती येथे माघ पोर्णिमेला सोमवार, दि. २५ डिसेंबर रोजी रेणुका देवी यात्रा होत आहे.
या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्हा रेणुकाभक्त संघटना आणि करवीर निवासिनी भक्त संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, शाहुपुरी, राजारामपुरी तसेच साने गुरुजी वसाहत, कसबा बावडा येथील रेणुकाभक्त शुक्रवारी रात्री एसटीच्या विशेष बसमधून रवाना झाले.
कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या माध्यमातून एसटी खात्याकडे विभागातून १२८ बसेस भाविकासाठी बुकिंग केल्या आहेत. सौंदत्ती मार्गावरील धर्मस्थळांना भेट देऊन या बसेस रविवारी रात्री सौंदत्ती डोंगरावर पोहोचतील. पुणे बेंगळूरु महामार्गावरील विकासवाडी (ता. करवीर) येथील लक्ष्मी टेकडी येथे यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे.
या मार्गावर भाविकांना अल्पोपहार वाटप करण्यात येतो. माजी आमदार मालोजीराजे यांच्यावतीने गेली १८ वर्षे भाविकासाठी घटप्रभा येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यंदाही शनिवार, दि. २३ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून घटप्रभा वैद्यकीय महाविद्यालयाजवळ मैदानावर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.