संदीप कवाळे होणार ‘स्थायी’ सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:07 PM2020-02-08T15:07:18+5:302020-02-08T15:10:51+5:30

महानगरपालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संदीप शिवाजीराव कवाळे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार सायंकाळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कवाळे यांना चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, त्यानंतर सचिन पाटील यांना संधी देण्याचे ठरले आहे.

Sandeep Kawale to be 'permanent' chairman | संदीप कवाळे होणार ‘स्थायी’ सभापती

संदीप कवाळे होणार ‘स्थायी’ सभापती

Next
ठळक मुद्देसंदीप कवाळे होणार ‘स्थायी’ सभापतीमंगळवारी होणार निवडणूक : ‘परिवहन’साठी प्रतिज्ञा उत्तुरे

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संदीप शिवाजीराव कवाळे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार सायंकाळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कवाळे यांना चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, त्यानंतर सचिन पाटील यांना संधी देण्याचे ठरले आहे.

स्थायी समितीच्या सभापतींसह परिवहन तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी अर्ज भरायचे होते. दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत स्थायी समिती सभापतीकरिता संदीप कवाळे यांनी अर्ज भरला. त्यांच्याविरोधात भाजपच्या विजयसिंह खाडे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

स्थायी समितीवर सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी -शिवसेना यांचे वर्चस्व असल्यामुळे कवाळे यांच्या निवडीवर मंगळवारी (दि. ११) केवळ औपचारिक मोहोर उमटविण्याचे काम बाकी आहे.

सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी -शिवसेना आघाडीत ठरल्याप्रमाणे परिवहन समिती सभापतिपद हे शिवसेनेकडे राहणार असून, अपेक्षेप्रमाणे सभापतीसाठी आघाडीकडून प्रतिज्ञा उत्तुरे यांचे नाव आले. त्यांनी अर्ज दाखल केला; तर भाजप-ताराराणीकडून महेश वासुदेव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी काँग्रेसकडून शोभा कवाळे, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून भाग्यश्री शेटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून वहिदा सौदागर, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून रूपाराणी निकम यांनी अर्ज भरला. तिन्ही सभापतींची निवडणूक मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दौलत देसाई असतील.

कवाळे, पाटील यांना चार-चार महिने

स्थायी समिती सभापतिपदाकरिता संदीप कवाळे व सचिन पाटील यांच्यात रस्सीखेच होते. त्यातच अजित राऊत यांनीही दावा केल्यामुळे चुरस अधिकच वाढली. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर झाला. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, अजित राऊत यावेळी उपस्थित होते.

यावेळी कवाळे व पाटील यांना संधी देण्याचा निर्णय झाला. ११ जून रोजी कवाळे यांनी राजीनामा द्यावा, असेही यावेळी ठरले. कवाळे यांनी राजीनामा दिल्यावर सचिन पाटील यांना सभापती करण्यात येणार आहे.

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत अभेद्य

गेल्या चार-साडेचार वर्षांत स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीतील एक अपवाद वगळता कॉँग्रेस-राष्ट्रवादी -शिवसेना आघाडी अभेद्य राहिली आहे. राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या दमनशक्ती असलेल्या राजकारण्यास कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी फोडता आली नाही.

आता तर राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक घट्ट झाले आहे. आठ-नऊ महिन्यांनी तुलनेने कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडेच उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी असणार आहे.
 

 

Web Title: Sandeep Kawale to be 'permanent' chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.