कडकनाथ घोटाळ्यात संदीप मोहितेसह दोघांना अटक, खोतांकडून राजू शेट्टी लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 05:52 AM2019-09-02T05:52:51+5:302019-09-02T05:53:16+5:30
घोटाळ्यामधील कंपनी संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी मोर्चा काढला होता.
कोल्हापूर/इस्लामपूर (जि. सांगली) : रयत अॅग्रो इंडिया आणि महारयत अॅग्रो इंडिया या कंपन्यांच्या माध्यमातून कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातून शेतकऱ्यांना मालामाल करण्याचे आमिष दाखवत कोट्यवधींचा गंडा घालणाºया घोटाळ्यातील संशयित संदीप सुभाष मोहिते याला येथील न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, यातील हणमंत शंकर जगदाळे (रा. अंबक चिंचणी, ता. कडेगाव) या संशयितास पोलिसांनी रविवारी अटक केली..
घोटाळ्यामधील कंपनी संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी मोर्चा काढला होता. या वेळी जवळपास २४६ शेतकºयांनी आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारींचे अर्ज पोलिसांकडे दिले होते. पुरावे घेऊन यावे - खोत कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात आपला सहभाग असल्याचे पुरावे माजी खासदार राजू शेट्टींकडे असल्यास त्यांनी ते घेऊन बिंदू चौकात यावे, असे खुले आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. त्याचबरोबर महारयत अॅग्रो कंपनीत आपले व कुुटुंबीयांचे नाव असल्यास राजकीय संन्यास घेऊन, प्रसंगी भर चौकात फाशीही घेऊ; परंतु खा. शेट्टी यांनी आरोप सिद्ध न केल्यास ते काय प्रायश्चित्त घेणार, हे सांगावे, असा टोलाही खोत यांनी लगावला.
राजू शेट्टींना वकिलांमार्फत नोटीस देणार
कडकनाथ कोंबडी प्रकल्प फसवणूक प्रकरणात आपली नाहक बदनामी केल्याप्रकरणी दिग्विजय चव्हाण-पाटील व स्वप्निल पाटील यांच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच खासदार राजू शेट्टी यांना वकिलामार्फत बदनामीची नोटीस पाठविणार असल्याचे मंत्री खोत यांनी सांगितले.
शेतकºयांचे पैसे मिळवून द्या - शेट्टी
कोल्हापूर : सत्तेचा माज आला, की बेताल वक्तव्ये मुखात येतात. त्यांनी अशा प्रकारे आकांडतांडव करण्यापेक्षा गुंतवणूक केलेल्या गरीब शेतकºयांचे पैसे वसूल करून दिले असते, तर अधिक बरे झाले असते, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.