संदीप नरकेंचा नाट्यमय ‘यू टर्न’
By admin | Published: December 17, 2015 01:34 AM2015-12-17T01:34:08+5:302015-12-17T01:41:35+5:30
कुंभीचे रणांगण : सहानुभूती हरपली; रात्रीत निर्णय बदलला
कोपार्डे : नाट्यमयरीत्या माघार घेत संदीप नरके यांनी सर्वांनाच धक्का दिला; पण एका रात्रीत ‘यू टर्न’ घेत पुन्हा रिंंगणात राहण्याच्या घेतलेल्या निर्णयाने त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
संदीप नरके यांनी घरात बंड करीत ‘कुंभी’च्या मैदानात शड्डू ठोकला होता; पण नरके यांनी आपली भूमिका जाहीर केल्यापासून त्यांच्या भूमिकेविषयीच कार्यक्षेत्रातून शंका घेतली जात होती. ते शेवटपर्यंत रिंगणात राहणार नाहीत, अशी चर्चा रंगत होती. त्यांनी मेळावे, संपर्कभेटींच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली. विरोधी गटाची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न केला; पण करायचे तेच केले. शेवटच्या क्षणी माघार घेत असल्याची घोषणा केली. माघारीच्या वेळेनंतर त्यांनी अर्ज दाखल केल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांची माघार होऊ शकली नाही. त्यांनी माझ्या राजकारणाचा शेवटचा दिवस असल्याचे सांगत माघारीच्या ठिकाणी भावनिक वातावरण निर्मिती केली होती; पण एका रात्रीत त्यांनी ‘यू टर्न’ घेत चिन्हवाटपाच्या दिवशी निवडणूक कार्यालयात हजेरी लावत सर्वांनाच धक्का दिला. नरके तिथे आल्यानंतर विरोधी बचाव मंचच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण आपण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. संदीप नरके यांच्या या भूमिकेची चर्चा मात्र कुंभी परिसरात सुरू असून, माघारीनंतर त्यांच्याविषयी असणारी सहानुभूती आता चेष्टेत बदलली आहे.
रडायचे नाही, लढायचे...!
माघार घेतल्यानंतर आपण रात्रभर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक वाचले. त्यामध्ये छत्रपतींनी ‘रडायचे नाही, लढायचे...’ असे आपल्या मावळ्यांना सांगितल्याचे वाचले. त्यातून स्फूर्ती घेऊन आपण माघारीचा विचार बदलल्याचे संदीप नरके यांनी माघारीच्या ठिकाणी सांगून आणखी एक धक्का दिला.
कदाचित अण्णांची इच्छा असावी...
एवढ्या घडामोडी होऊन, माघारीनंतरही मी रिंगणात राहतोय, हे पाहता माझे आजोबा स्व. डी. सी. नरके यांची आपण कारखान्यात संचालक म्हणून जावे, अशी कदाचित इच्छा असावी, असेही संदीप नरके यांनी सांगितले.
नरके पॅनेलला ‘अंगठी,’ तर ‘बचाव’ला कपबशी
बुधवारी चिन्हवाटपामध्ये नरके पॅनेलला ‘अंगठी,’ तर ‘कुंभी बचाव मंच’ला ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाले. संदीप नरके यांना ‘पतंग’ चिन्ह मिळाले.